Telangana News: केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या महत्त्वाकांक्षी अमेरिका दौऱ्याला राजकीय मंजुरी नाकारली आहे. हा दौरा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेचा विषय ठरला होता. रेड्डी यांच्या या दौऱ्यामागचा हेतू जगातील नामांकित शैक्षणिक संस्थांना तेलंगणात आणण्याचा होता. मात्र, याच दौऱ्याला सरकारनं परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला राजकीय मंजुरी नाकारल्यामुळे काँग्रेस हा मुद्दा तापवण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून रेड्डी यांचा अमेरिका दौरा निर्धारित नियमांशी सुसंगत नसल्याचं कारण देण्यात आले आहे.
केंद्र सरकारनं अचानक मंजुरी नाकारत दिलेल्या धक्क्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्या ‘TelanganaRising’ शिष्टमंडळाच्या अमेरिका दौऱ्याचा टप्पा रद्द करून नियोजित वेळेआधीच हैदराबादला परतावे लागणार आहे.
ए. रेवंत रेड्डी यांना अमेरिका दौऱ्यासाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी दिली. तसेच रेवंत रेड्डी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘राजकीय कारणास्तव परवानगी नाकारल्याबद्दल’ आश्चर्य व्यक्त केले आहे. हा दौरा केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) भाग म्हणून जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांना तेलंगणात आणण्यासाठी आयोजित करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटलं.
मात्र, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अमेरिका दौरा रद्द झाल्यानंतरही नियोजित MoU आणि भागीदारी करारांवर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला मंजुरी नाकारण्यात आली असली, तरी त्यांच्या ब्रिटन दौऱ्याला मंजुरी देण्यात आली होती.
रेवंत रेड्डी सध्या लंडनमध्ये असून, त्यांचा ब्रिटन आणि अमेरिका असा 10 दिवसांचा दौरा नियोजित होता. ते 30 ऑगस्ट रोजी हैदराबादला परतणार होते. मात्र, अमेरिका दौऱ्याला परवानगी न मिळाल्यानंतर त्यांनी 23 ऑगस्ट रोजी लंडनहून हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला आहे.
रेवंत रेड्डी यांनी भाजपवर टीकेची झोड उठवताना “राष्ट्र उभारणी आणि देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न असेल, तर आपण राजकारण आणि निवडणुकांच्या पलीकडे विचार केला पाहिजे, असा माझा नेहमीच विश्वास असल्याचं ठणकावून सांगितलं. तसेच हैदराबादला जगातील सर्वोत्तम शिक्षण आणि कौशल्य विकास संस्थांचे केंद्र बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.