Modi Government 3.0 Sarkarnama
देश

Modi Government news : दिल्लीत घडामोडींना वेग, मोदी सरकारमधील पहिला राजीनामा; आणखी पाच मंत्र्यांचा पत्ता होणार कट?

George Kurian Resignation : मोदी सरकारमधील आणखी एक मोठे नाव म्हणजे हरदीप सिंह पुरी. ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत. जगभरात गाजलेल्या एपस्टीन फाईलमध्ये त्यांचेही नाव आले होते.

Rajanand More

Cabinet Reshuffle 2026 : दिल्लीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहे. महाराष्ट्रातील ऑपरेशन टायगर, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील फूट आणि आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत दिल्लीत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्र्यांचा पहिला राजीनामा आला आहे. पुढील काळात आणखी पाच मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून तो स्वीकारण्यातही आला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कुरियन यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला, याची चर्चा सुरू झाली आहे. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपत असतानाही भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता.

पाच मंत्रीही रांगेत?

कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी पाच मंत्रीही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये पंजाबमधील नेते रवनीत सिंह बिट्टू यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. त्यांचीही राज्यसभेची मुदत संपत असून त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कुरियन यांच्यानंतर बिट्टू यांच्याच राजीनाम्याच अधिक शक्यता आहे. ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत.

बिट्टू यांच्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही राजीनामा घेतला जाऊ शकतो, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. मागील काही दिवसांत नीट पेपरफुटी, फेरपरीक्षा, सीबीएसई परीक्षेतील गोंधळासह अन्य काही परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा देशभरात चांगलाच गाजला. नीट परीक्षा दिलेल्या १६ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेपूर्वी आत्महत्या केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. सोशल मीडियात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीकडूनही प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे.

मोदी सरकारमधील आणखी एक मोठे नाव म्हणजे हरदीप सिंह पुरी. ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत. जगभरात गाजलेल्या एपस्टीन फाईलमध्ये त्यांचेही नाव आले होते. त्यावरून विरोधकांनी संसदेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हा मुद्दा बराच गाजला होता. तसेच पुरी यांची राज्यसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, परिणामी त्यांना मंत्रि‍पदाची राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील आणखी दोन नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांचा समावेश आहे. मल्होत्रा हे सध्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री आहे. त्यांची नुकतीच दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एक व्यक्ती एक पद या भाजपमधील सुत्रानुसार त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतले जाऊ शकते.

पंकज चौधरी यांच्याबाबतही हेच घडू शकते. ते अर्थ खात्याचे राज्यमंत्री आहे. त्यांची नुकतीच उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राज्यात पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक आहे. भाजपसाठी लोकसभेच्यादृष्टीने सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या यूपीसारख्या राज्याची धूरा चौधरी यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांचे केंद्रातील मंत्रिपद लवकरच जाणार, हे निश्चित मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT