PM Narendra  Modi
PM Narendra Modi  Sarkarnama
देश

मोदी म्हणाले; परीक्षा ‘ऑनलाइन’ की ‘ऑफलाइन’ ही समस्या नव्हे : मनाची एकाग्रता महत्वाची

सरकारनामा ब्यूरो

पुणे : परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होते ही समस्या नसून आपल्या मनाची एकाग्रता न होणे ही समस्या आहे. अभ्यासातून मन भरकटले की कोणत्याही माध्यमाची परीक्षा असली तरी गडबड निश्चित होणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सांगितले. बोर्डाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या संवाद सत्रात ते बोलत होते.

दिल्लीच्या तालकटोरा आच्छादित मैदानात झालेल्या या कार्यक्रमात देशविदेशांतून कित्येक लाख विद्यार्थी, पालक, शिक्षकदेखील ऑनलाईन सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी निवडक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना या पिढीच्याच भाषेत संवाद साधला. तुम्हाला नव्हे तर तुमच्या पालकांनाच परीक्षेची जास्त धास्ती पडली असल्याचे मला जाणवते, असे त्यांनी सांगताच हास्याची लकेर उमटली.

कोरोनामुळे एका वर्षाच्या खंडानंतर आपण भेटत आहोत असे म्हणून पंतप्रधानांनी सांगितले की परीक्षेआधीच किती गुण पडतील ही अनाठायी भिती अजिबात बाळगू नका. परीक्षा हा आयुष्याचा निव्वळ एक भाग आहे, ते सारे जीवन नव्हे. परीक्षेतील अनुभवांना जीवनाच्या विकासाची यात्रा व आपली ताकद बनवा.आयुष्यात कोणतीही स्पर्धा ही संधी असते व तिचे सोने करणे, नवनवीन प्रयोग करणे व त्यासाठी धोका स्वीकारणे हे महत्वाचे असते. आपण सदैव वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. परीक्षेत काय होईल हा भविष्यकाळ आहे व कितीही विचार केला तरी जे गुण मिळायचे ते मिळणारच. जेवढा आनंद मोबाईल, आयपॅड यात घुसण्यात आहे त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात शिरण्यात हजारो पटींनी जास्त आनंद असून यात ध्यान अतिशय मोलाचे माध्यम ठरते. मनाची स्थिरता महत्वाची आहे.

आपल्या पाल्याची ताकद ओळखा असे पालकांना सांगून मोदींनी, तुमचे विचार, तुमची अपूर्ण स्वप्ने त्यांच्यावर लादू नका. तुम्ही त्यांची ताकद ओळखत नाही हा तुमचा कमकुवतपणा आहे व येथूनच तुम्ही व पाल्य यांच्यात दुरावा निर्माण होतो असेही पंतप्रधानांनी पालकांना बजावले.

कांही प्रश्न व पंतप्रधानांची उत्तरे

प्रश्‍न : परीक्षेवेळी आमचा जीव घाबरतो तेव्हा तयारी कशी करणार?

मोदींचे उत्तर - तुला भिती का वाटावी? ही तुझ्या आयुष्यातील काय पहिलीच परीक्षा आहे का? अनेक वेळा तुम्ही परीक्षा दिली असेल तर याच परीक्षेची इतकी भिती वाटण्याचे कारण काय ? तर तुमच्या मनातील तणाव. तो तणावच तुमच्यात घबराट निर्माण करतो. तो दूर करा, दबावाच्या वातावणाची निर्मिती तुम्हीच होऊ देऊ नका. परीक्षा म्हणजे तुमच्यापढे असलेल्या विशाल विकास यात्रेचा छोटासा भाग आहे. असे अनेक टप्पे यापुढे येणार आहेत. यापूर्वीच्या अनुभवांनाच आपली ताकद बनवले पाहिजे.

प्रश्‍न : मागच्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणामुळे ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागली त्यामुळे अभ्यासातून लक्ष उडते.

मोदींचे उत्तर - तुम्ही अभ्यास करता तेव्हा वाचन (रीड) करता की केवळ अक्षरांवरून डोळे फिरवता (रील) पाहा मी तुला बरोबर पकडले की नाही? अनेकदा वर्गांत असतानाही तुम्ही मनाने तेथे काय चालले यात तुम्ही नसताच. मन त्या गोष्टीत नसेल तर ऐकू येणेही बंद होते. समस्या माध्यम नाही तर आपले मन आहे. माध्यमे काळानुसार बदलत राहातात. माझे मन अभ्यासात लागत असेल तर ऑनलाइन असो की ऑफलाइन, काही फरक पडत नाही.

प्रश्‍न - तणावाला कसे सामोरे जायचे?

मोदींचे उत्तर - तुमची आज, या घडीला जेवढी तयारी आहे त्यासह आत्मविश्वासाने पेपर सोडवा. परीक्षा देताना मनात आपण एखाद्या उत्सवाला जात आहोत हा भाव ठेवा.

प्रश्‍न - परीक्षा एक उत्सव मानायचा तर पालक व शिक्षकांचे काय?

मोदींचे उत्तर - (हसतहसत) हा प्रश्न त्या दोघांसाठी आहे तर मी त्यांनाच काही सांगू इच्छितो. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्याच्या साऱ्या कुटुंबाला ओळखत असत. आता आपला मुलगा-मुलगी दिवसभर काय करतो हे पालकांनाच धड माहिती नसते. शिक्षकांना फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून देणे इतक्याशीच देणे घेणे असते. जोवर आम्ही मुलांची आवड, त्यांच्या आकांक्षा, त्यांची स्वप्ने, ते कोठे अडखळत आहेत काय, याकडे लक्ष देणे या गोष्टी करत नाही तोवर दुरावाच वाढत जाणारा असतो.

प्रश्‍न - परीक्षा आली की केलेला अभ्यासच विसरायला होते...

मोदींचे उत्तर - प्रत्येक विद्यार्थ्यालाच वाटते की तो विसरला. किंवा जे वाचले नाही ते पहिल्यांदाच पेपरमध्ये आले आहे.तुम्ही पेपर सोडवत आहात व तुमच्या मनात विचार असतील की आई घरात बसून टीव्ही पहात आहे तर तुमचे फक्त शरीर इथे आहे. तुम्ही वर्तमानात जगा कारण देवाची सर्वांत मोठी देणगी वर्तमानकाळ आहे. स्मरणशक्तीचा संबंध केवळ परीक्षेशी नव्हे तर साऱ्या जीवनाशीच असतो. आपले मन स्थिर ठेवा व त्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मी स्वानुभवाने सांगू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT