Supriya Sule, Rahul Shewale Sarkarnama
देश

Supriya Sule : लोकसभेतील सीमावादाच्या खडाजंगीत सुप्रिया सुळेंना मिळाली शिंदे गटाच्या खासदारांची साथ

Supriya Sule : अमित शाह यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात लक्ष घालावे

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule News: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून त्याचे तीव्र पडसाद देशाच्या राजकारणात देखील उमटत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांकडून सीमावादाचा वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बारामती मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमावादाच्या मुद्दयांवर आपल्या संसदीय भाषणात तीव्र संताप व्यक्त केला. पण इतरवेळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणार्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या खासदारांचं सीमावादावर एकमेकांना दिलेली साथ चर्चेचा विषय ठरत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक पावित्रा घेत सीमावादाचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला. यावेळी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत महाराष्ट्र व मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुप्रिया सुळे यांना साथ दिली.

सुळे म्हणाल्या, '' गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात नवीन वाद सुरु झाला आहे. आमच्या बाजूचं जे कर्नाटक राज्य आहे. त्याच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधानं केली जात आहेत. मंगळवारी तर त्यांनी हद्द केली. महाराष्ट्रातील काही लोक सीमारेषेपलीकडे जात होते त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातला एकही जण अजून परत आलेला नाही. मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरु असून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे. आणि या दोन्ही राज्यात भाजप सरकार सत्तेत आहे'' अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला.

तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राविरोधात बोलत आहे. हे अजिबात चालणार नाही. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात लक्ष घालावे अशी मागणीही सुळे यांनी केली.

यावेळी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील सुप्रिया सुळे यांना साथ दिली.शेवाळे म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी मांडलेला प्रश्न जो आहे, खासकरुन महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न मागच्या काही वर्षांपासून सुरु आहे. सीमेवरील बेळगाव, कारवाड, निपाणीसहीत काही भागांमध्ये मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय करतंय. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यास अशाप्रकारे बंदी घालणारं कर्नाटक हे पहिलं सरकार आहेत. आणि तेथील सरकार व पोलीस यांच्याकडून मराठी भाषिकांवर जो अन्याय केला जात आहे त्याचा आम्ही धिक्कार करत आहोत. तसेच कर्नाटक सरकारकडून मराठी अस्मिता, आणि भाषिकांच्या तोडफोडीचं राजकारण सुरु असल्याचा आरोप देखील शेवाळे यांनी केला आहे.

यावेळी लोकसभेचे अध्यक्ष व सभापती ओम बिर्ला यांनी हा विषय संवेदनशील असून तो दोन राज्यांचा आहे. त्यामुळे यात केंद्र सरकार काही करु शकत नाही असं उत्तर दिलं.

मात्र, इतरवेळी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून उभे ठाकणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचे खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार सुळेंना शिंदे गटाचे खासदार शेवाळे यांनी दिलेली साथ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT