Mumbai : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी भाजप नेत्याची चौकशी सुरू केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या स्पेशल टास्क फोर्सने मंगळवारी हायकोर्टात ही माहिती दिली आहे. एका गुंतवणुकीच्या प्रकरणात दाखल याचिकेनंतर कोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते.
नागालँडचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री तेनजेन इमना अलोंग यांची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. हजेल मर्कंटाइल लिमिटेड या मुंबईतील कंपनीने याचिका दाखल केली आहे.
कंपनीच्या याचिकेनुसार, 2015 ते 2018 या कालावधीत अलोंग यांनी नागालँडमध्ये गुंतवणुकीसाठी कंपनीशी संपर्क साधला होता. एप्रिल 2015 मध्ये त्याबाबत करारही करण्यात आला. त्याअंतर्गत कंपनीने सुमारे 125 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बांधकाम करार आणि तांदूळ व साखरेच्या पुरवठ्याचाही त्यामध्ये समावेश होता.
करारानुसार सर्व कामे केल्यानंतर अलोंग यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यास टाळण्यास सुरूवात केली. त्यानंतर कंपनीने 9 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अलोंग हे सध्या कॅबिनेट मंत्री असल्याने मुंबई पोलिसांनी 24 जून रोजी ही तक्रार नागालँडच्या लोकायुक्तांकडे पाठवली. कंपनीने त्यावर आक्षेप घेत या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
याबाबत कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी वकील क्रांती हिवराळे यांनी सांगितले की, नागालँड लोकायुक्तांनी प्रतिसाद दिला असून त्यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण घडले त्यावेळी अलोंग मंत्री किंवा आमदार नव्हते. त्यामुळे हे प्रकरण आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने अलोंग यांची प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती कोर्टात दिली. त्यामुळे अलोंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.