Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? गुरुवारी होणार फैसला ? आयोगाच्या सुनावणीकडे लक्ष

NCP Crisis and Election Commission : निवडणूक आयोगात सुनावणी सलग होऊन फैसला होणार की पुन्हा नवी तारीख मिळणार ?

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे. या संदर्भातील पहिली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 9 नोव्हेंबर देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या गुरुवारी निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

गेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत शरद पवार गटाकडून 30 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहेत. गेल्या सुनावणीत अजित पवार गटाने जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.

तसेच "सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हालाच असून आम्हीच खरा पक्ष आहोत, शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात", असा गंभीर आरोप अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केला होता. तर गेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. मात्र, अजित पवार गटाकडून कोणताही नेता उपस्थित नव्हता.

शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद गेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने केला होता. अजित पवार गटाकडून गेल्या सुनावणीवेळी पी.ए.संगमा आणि सादिक अली या दोन केसचा दाखला दिला गेला होता. सोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख अजित पवार गटाकडून करण्यात आला होता.

दरम्यान, आता गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील सिंघवी युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनावणी सलग होऊन फैसला होणार की, पुन्हा नवी तारीख मिळणार, हे उद्याच्या सुनावणीनंतरच समोर येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडत आहेत.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT