Sanjay Raut and Sharad Pawar Sarkarnama
देश

Sanjay Raut And Sharad Pawar : "असे लोक संकुचित नसतात..." बाळासाहेबांचं नाव घेत पवारांकडून राऊतांचे कौतुक

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यासोबत कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. ते दिल्लीतील पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यासोबत कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. ते दिल्लीतील पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी संजय राऊतही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान झाला होता. या सन्मानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाराज झाला होता. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू मानतो, अशा लोकांबरोबर शरद पवार खुलेआम बसले आहेत. अशा गद्दार लोकांचा सन्मान आपल्या हातून होणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे, अशी आमची भावना असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते.

शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले होते. त्या नाराजी नाट्यानंतर (गुरुवार, 20 फेब्रुवारी) शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर आले होते. जेष्ठ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांच्या 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा शरद पवार, संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पार पडला. या पुस्तकाची प्रस्तावना राऊत यांनी लिहली आहे. तर शरद पवार यांनी पुस्तकासाठी अभिप्राय लिहला आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची (Sanjay Raut) आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. आज सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, "हे दोघं भेटणार." पण मला काही समजत नाही, एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील.

संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचाराचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील. मी सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं. सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे आणि त्याचे उत्तरही आम्ही त्या पद्धतीतूनच द्यायचो.

ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा. मला ते शरद बाबू म्हणत. फोनवर बाळासाहेब म्हणायचे "शरद बाबू मी येऊ भेटायला की तुम्ही येताय?" बोलावून घ्यायचे आणि भेटीत काल काय बोललो, काय लिहिलं याबद्दल यकिंचितही शल्य मनामध्ये कधी ठेवायचं नाहीत. अगत्य, आस्था, व्यक्तिगत सलोखा हा कधीही कमी झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेकांची नावे घेता येतील, असेही पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT