Ahmednagar Politics : भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पारनेर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय वैर टोकाचे आहे. हे दोघे एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. नगर-पाथर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीवर आता श्रेयवाद सुरू झाला आहे. याला कारण ठरले रस्त्यालगत उभे करण्यात आलेले फलक, यामुळे आता दोघांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)
रस्त्याची दुरुस्ती खासदार विखेंच्या पाठपुराव्यामुळे झाली म्हणून नगर-पाथर्डी रस्त्यालगत अभिनंदनाचे फलक लावले गेले आहेत. या फलकांवर आमदार मोनिका राजळे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचीदेखील छायाचित्रे आहेत. रस्त्यालगत असलेल्या गावांच्या नावाने लावलेले हे फलक समाजमाध्यमांवर झळकत आहेत. आता यावर आमदार लंके यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी खासदार विखेंचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे आमदार लंके यांनी त्या रस्त्यालगत उभी राहून प्रतिक्रिया दिली आहे.
'नगर-पाथर्डी या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीसाठी कोणीही पाठपुरावा करत नव्हते. शेवटी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपोषस्थळी आले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी लगेचच रस्त्याचे काम सुरू झाले. रस्ता आता खूप सुंदर झाला आहे. अधिकारी आणि काम करणाऱ्या ठेकेदारांना धन्यवाद देतो, असे लंके म्हणाले.
"या रस्त्यावर साडेचारशे लोकांचा बळी गेला होता. रस्ता चांगला होणे म्हणजे, अपघातात बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या रस्त्यासाठी कोणी आंदोलन केले हे जनतेला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे अशा फलकांना महत्त्व द्यायचे नसते. काहींना काम करायचे नसते, परंतु जाहिरातबाजी करायची असते. मी जाहिरातबाजी करणाऱ्यांमधील नाही," असा टोला आमदार लंके यांनी लगावला.
भाजपने फलकबाजीचा टायमिंग साधला -
पाथर्डीतील श्री क्षेत्र मोहटा देवी हे नगरसह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवानिमित्ताने हजारो भक्त देवीच्या दर्शनाला येतात. नगरमधील अनेक भाविक पायी प्रवास करून देवीच्या दर्शनाला जातात. आमदार नीलेश लंके हेदेखील त्यांच्या मतदारसंघातील महिलांना देवीच्या दर्शनाला घेऊन जाण्याचा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून राबवत आहेत.
लंके यांनी यावर्षी आयोजित केलेल्या मोहटा यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार येत आहेत. भाविकांच्या मांदियाळीने नगर-पाथर्डी रस्ता व्यापून जाणार आहे. यातच रस्त्याच्या कामाच्या श्रेयासाठी फलकबाजी होत आहे. दरम्यान, चांगला रस्ता कोणामुळे झाला, यावर चर्चा होत राहील.
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.