Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाची वर्णी : लंके की जगताप? दोघांची जबरदस्त फिल्डिंग!

Sangram Jagtap Vs Nilesh Lanke : नगरमधून कुणाला मिळणार संधी ?
Ahmednagar Politics
Ahmednagar PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Expansion : नवरात्र उत्सवानंतर आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदाच्या काही जागा वाट्याला येण्याची शक्यता आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी अजित पवार गटातील आमदारांनी 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार नीलेश लंके आणि नगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप या दोघांची नावे पुन्हा एकदा इच्छुकांच्या चर्चेत आली आहेत. या दोघांपैकी कोण मंत्रिपद खेचून आणतो, याकडे लक्ष लागले आहे. मंत्रिपद खेचून आणण्याच्या आघाडीत नीलेश लंके यांनी जोरदार तयारी लावली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारनेर मतदारसंघात नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी अजित पवार यांच्याबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे 16 ऑक्टोबरला पारनेरमध्ये येत आहेत.

Ahmednagar Politics
Nagar Politics : नगर नव्हे अहिल्यानगर; सुळेंचा दौरा अन् प्राजक्त तनपुरेंच्या ट्विटची चर्चा

नवरात्र उत्सवानिमित्ताने नीलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पारनेरमधील महिलांसाठी पाथर्डीतील मोहटा देवी यात्रेचे गेल्या सात वर्षांपासून आयोजन केले जाते. नीलेश लंकेंचा यासाठी विशेष पुढाकार असतो. नीलेश लंके यांचा विधानसभेचा मार्ग याच यात्रेमुळे सुकर झाल्याचे बोलले जाते. यावर्षी या यात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. नीलेश लंके यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा टायमिंग साधून अजित पवार यांना यात्रेच्या प्रारंभाला बोलावले आहे.

भाजपबरोबर सत्तेत सहभागी होताना अजित पवार गटाच्या वाट्याला जी मंत्रिपदे आली, त्यात नगरमधून अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या एकाही आमदारांच्या वाट्याला मंत्रिपद आलेले नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी नगरमधील अजित पवार गटाबरोबर असलेल्या आमदारांची नावे चर्चे येऊ लागली आहेत. लंके आणि जगताप यांची स्वतःची शक्तिस्थाने आहेत. असे असले तरी शेजारी-शेजारी मतदारसंघ असलेल्या या दोघांमध्ये काहीसा असलेला 'अबोला' वरिष्ठ नेत्यांकडून सुटलेला नाही.

Ahmednagar Politics
Mahur Market Committee : बाजार समितीच्या पराभवाला जबाबदार कोण? भाजप की आमदार भीमराव केराम

विखे विरुद्ध लंके आक्रमकता कमी झाली

नीलेश लंके आणि संग्राम जगताप हे तरुण आमदार आहेत. नीलेश लंके यांची विधानसभेची पहिलीच टर्म आहे. तसे ते शिवसेनेच्या तालमीत तयार झाले आहेत. कोविड काळात त्यांनी 'शरद पवार कोविड सेंटर'मधून रुग्णांची केलेली सेवा राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरला होता. लंके युवक आणि तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादी एकसंघ असताना शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीदेखील ते चांगला संपर्क ठेवून होते. यातून त्यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत आले होते. लंके हेदेखील वेळोवेळी भाजपचे खासदार सुजय विखे यांना आव्हान देत होते. आता दोघे सत्तेत असल्याने एकमेकांविरुद्धची आक्रमकता कमी झालेली पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडेंशी असलेली मैत्री चमत्कार करेल?

संग्राम जगताप हे अजित पवार यांचे खास! अजित पवार जिथे, तिथे संग्राम जगताप, असे समीकरणच आहे. तसे जगताप परिवाराचे पवार घराण्याची चांगले संबंध आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे या नगर दौऱ्यावर असले की, ते जगताप यांच्या घरी असायचे. शरद पवार यांच्यामुळे अरुण जगताप यांना विधान परिषदेवर दोनदा संधी मिळाली. संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीकडून विधानसभेची दुसरी टर्म आहे. आता ते अजित पवार गटाबरोबर सत्तेत सहभागी झालेत. खासदार सुजय विखे यांच्याशी असलेली त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत असते. संग्राम जगताप यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेली मैत्री चमत्कार करेल आणि जगताप यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा आता नगर शहरात रंगली आहे.

Ahmednagar Politics
NCP Crisis: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील युवा पदाधिकारी आपापसांतच भिडले

बदलत्या राजकारणाची चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी पारनेरमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मोहटा यात्रेला प्रारंभ करण्यासाठी येत आहेत. गेल्या वर्षी खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत मोहटा देवी यात्रेचा प्रारंभ झाला होता. सुळे आणि चाकणकर यांनी मोहटा देवीची यात्रा बसमधून केली होती. बसचे चालक आमदार नीलेश लंके झाले होते. लंके आता अजित पवारांबरोबर आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे या नगर दौऱ्यावर होत्या. या वेळी अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार सुळे यांच्याकडे पाठ फिरवली. बदलत्या राजकारणाची चर्चा नगरमध्ये रंगली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com