Nitin Navin latest political decision Sarkarnama
देश

BJP Organization News : मोठी बातमी! नितीन नवीन यांचा मास्टरस्ट्रोक; 'या' दिग्गज नेत्यावर सोपवली राष्ट्रीय संघटकपदाची धुरा!

BJP national leadership appointment : नितीन नवीन यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेत दिग्गज नेत्याकडे राष्ट्रीय संघटकपदाची धुरा सोपवली. या नियुक्तीमागील राजकीय गणित आणि त्याचे परिणाम जाणून घ्या.

Rashmi Mane

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या प्रयत्नांत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अनुभवी संघटक नागेंद्र नाथ त्रिपाठी यांच्यावर राष्ट्रीय संघटक (वरिष्ठ कार्यकर्ता संपर्क) पदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीची अधिकृत माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील बेलौली गावचे रहिवासी असलेले नागेंद्र नाथ त्रिपाठी यांना संघटन क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र दिल्ली असेल. यापूर्वी ते बिहार आणि झारखंडमध्ये प्रादेशिक संघटन महामंत्री म्हणून काम पाहत होते.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्रिपाठी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय विद्यार्थी अवस्थेतच झाला. शिक्षणादरम्यानच त्यांची संघकार्याकडे ओढ निर्माण झाली आणि पुढे त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून विविध भागांत काम केले. युवकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासोबतच संघटन विस्तारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही विविध पदांवर काम केले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यक्षमतेमुळे वर्ष 2003 मध्ये त्यांची उत्तर प्रदेश भाजपच्या संघटन महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. सुमारे 8 वर्षे त्यांनी राज्यातील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडणूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी काम केले.

यानंतर वर्ष 2011 मध्ये त्यांच्यावर बिहारच्या संघटन महामंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे ऑगस्ट 2021 मध्ये त्यांना बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी प्रादेशिक संघटन महामंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. या काळात त्यांनी पक्ष आणि संघ यांच्यातील समन्वय अधिक मजबूत केला.

संघटनात्मक रणनीती आखणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि पक्षाची रचना अधिक सक्षम करणे यासाठी त्रिपाठी ओळखले जातात. ते प्रकाशझोतात कमी दिसत असले तरी संघटन उभारणीत त्यांचे योगदान मोठे मानले जाते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

SCROLL FOR NEXT