Amit shah Sarkarnama
देश

Amit Shah : ''2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नाही, मोदींसोबत देश...''; शाहांनी विरोधकांना डिवचलं

Bjp Government : देशातील जनतेनं इतर पक्षांना लोकसभेतील विरोधी पक्ष होण्याची देखील संधी दिली नाही...

सरकारनामा ब्यूरो

Amit Shah On 2024 Election : देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित मोट बांधण्याच्या उद्देशानं जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच राहुल गांधींनीही भारत जोडो यात्रेद्वारे देशभरात काँग्रेससाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. याचदरम्यान, भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना डिवचलं आहे.

अमित शाह यांनी एएनआय (ANI)या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.यावेळी त्यांनी नक्षलवाद, २०२४ च्या निवडणुका, दहशतवाद यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शाह म्हणाले, 2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नाही, देश मोदींसोबत एकतर्फी पुढे जात आहे. देशातील जनतेनं इतर पक्षांना लोकसभेतील विरोधी पक्ष होण्याची देखील संधी दिली नाही. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे.

हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी समूहाच्या वादाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मात्र, या प्रकरणात भाजपाला लपविण्यासारखे काहीच नाही. तसेच या मुद्द्यावरुन भाजपाला घाबरण्याची देखील गरज नाही असंही ठाम मत शाह यांनी यावेळी व्यक्त केले.

विरोधक २००२ पासून मोदींवर हल्ला करत आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मिळाले आहे. प्रत्येकवेळी मोदी हे आणखी बळकट होत गेले आहेत असं विधान बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन विरोधकांनी केलेल्या आरोपाबाबत शाह यांनी केलं आहे. तसेच विरोधक काहीही म्हणत असले तरी सत्य लपू शकत नाही. सत्यावर कोणतंही षडयंत्र रचलं तरी ते सूर्यासारखे तळपून बाहेर येतं असा विश्वासही व्यक्त केला आहे.

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बिहार आणि झारखंड राज्यातील नक्षलवाद संपला आहे. छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी खात्रीही शाह यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकारची स्थिती चांगली आहे. याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या काळात भारताला G-20 चे नेतृत्व मिळालं आहे. G-20 यशस्वी होत असून त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना मिळायलाच हवं असंही शाह म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT