Election Commission Sarkarnama
देश

Election Commission : वेळापत्रक जाहीर करण्याआधी निवडणूक आयुक्तांचे EVM बाबत मोठं विधान; म्हणाले...

Rajanand More

New Delhi : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची आज घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषदेचे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. पण त्याआधीच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम आणि निवडणुकीबाबत महत्वाचे विधान केले आहे.    

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आजपासून आचारसंहिता लागू होईल. दिवाळीनंतर मतदान आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांत निकाल जाहीर केला जाऊ शकतो. आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक समोर येईल. त्यामुळे याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक होत आहे. हरियाणात अनपेक्षित पराभव झाल्यानंतर काँग्रेससह इतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही मतदारसंघात ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसेच निवडणूक पारदर्शक व्हावी, अशीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

विरोधकांच्या या आरोपांना राजीव कुमार यांनी आजच्या पत्रकार परिषदेआधी उत्तर दिले आहे. विरोधकांच्या आरोपांना मतदार मतदानातून उत्तर देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ईव्हीएमचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाले राजीव कुमार?

मतदानात सक्रीय सहभागी होत लोकांकडून याचे उत्तर दिले जाते. ईव्हीएम हे शंभर टक्के फुलप्रुफ असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा सांगतिले आहे. याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही पुन्हा यासंदर्भात सांगू, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हरियाणातील निवडणुकीनंतर काँग्रेसकडून तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला होता. ईव्हीएम मशीनची बॅटरी कमी असलेल्या मतदानकेंद्रांमध्ये काँग्रेसला अधिक मते मिळाली. तर बॅटरी 99 टक्के असलेल्या मतदान केंद्रात कमी मते मिळाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. काँग्रेस कमी मते मिळालेल्या काही ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाकडे याबाबत अधिकृत तक्रारीही केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राजीव कुमार यांचे आजचे विधान महत्वाचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT