NCP Sharad Pawar party update : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण तसेच एनडीएला पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही शंका वाटू लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीच सोशल मीडियात पोस्ट करत याबाबतचे विधान केले आहे.
चिदंबरम यांनी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, संसदेच्या मागील अधिवेशनात मंजूर न झालेले १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा सादर करण्याची तयारी भाजप करत असल्याची माहिती आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद विधेयकात असल्याचे सांगण्यात आले होते.
विधेयकाचा खरा उद्देश मतदारसंघांची पुनर्रचना आणि शक्यतो मतदारसंघांच्या सीमांमध्ये राजकीय फायद्यासाठी फेरबदल करण्याबाबत प्रयत्न असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे. यापूर्वीच १०६ व्या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणासाठी नवीन विधेयक आणण्याची कोणतीही नसल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीला बाजूने वळविण्याचा प्रयत्न
विधेयकाला दोन तृतियांश पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपकडून इंडिया आघाडीतील पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत चिदंबरम यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता विधेयकाला आवश्यक पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि द्रमुक (DMK) या पक्षांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाजपच्या प्रयत्नांवर बोलतानाच चिदंबरम यांनी दोन्ही पक्षांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि द्रमुक यांनी या विधेयकाचा खरा उद्देश ओळखला आहे. त्यामुळे भविष्यातही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील. नव्याने सादर होणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या भूमिकेचा आणि विवेकाचा विश्वासघात ठरेल, असेही चिदंबरम म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.