Nawaz Sharif, Imran Khan, Bilawal Bhutto Sarkarnama
देश

Pakistan Election 2024 : ‘लंडन प्लॅन’ फेल! इम्रान खान यांची बॅट नव्हे ‘अपक्ष’ तळपले...

Rajanand More

New Delhi : पाकिस्तान संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर रविवारी जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून 265 पैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले असून त्यापैकी 101 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक - ए - इंसाफ (PTI) पक्षाचा अपक्षांना पाठिंबा होता. (Pakistan Election 2024) 

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला मतदान झाले होते. आर्थिक संकट आणि दहशतवादाने ग्रासलेल्या पाकिस्तानात निवडणूक (Election) होत असल्याने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. त्यामध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्षांनी बाजी मारली आहे. एका मतदारसंघातील निवडणूक पुन्हा घेतली जाणार आहे.

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष निवडून आले आहेत. इम्रान यांच्या पक्षावर आणि बॅट या चिन्हावर निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या काळात बंदी घातल्याने सर्व उमेदवारांना अपक्ष म्हणून उतरावे लागले. पण त्यानंतरही इम्रान यांनी आपला करिष्मा दाखवत 101 उमेदवार निवडून आणले आहेत. मात्र त्यांना 133 हा जादुई आकडा गाठता आला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्रान खान यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी पंतप्रधान व पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ (PMLN) पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचे 75 उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांचा पक्ष सर्वाधिक मोठा ठरला असला तरी सत्तास्थापनेपासून दूर राहिला आहे. बिलावल झरदारी भुट्टो (Bilawal Zardari Bhutto) यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (PPP) केवळ 54 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे.

लंडन प्लॅन फेल ठरला...

पीटीआयच्या पाठिंब्यावर 101 उमेदवार विजयी झाल्यानंतर जेलमध्ये असलेल्या इम्रान खान ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देशातील निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याचा दावा करत त्यांनी लोकांचे आभार मानले. ‘लंडन प्लॅन’ फेल झाल्याचे सांगत त्यांनी शरीफांवरही टीका केली.

सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू

अपक्षांना सर्वाधिक 101 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही. सत्तास्थापनेसाठी 133 एवढे संख्याबळ अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अपक्षांना पक्षात प्रवेश केल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करता येणार नाही. त्यांना 32 सदस्यांचा पाठिंबाही मिळवावा लागणार आहे. त्यासाठी बिलावल भुट्टो यांच्यासह इतर छोट्या पक्षांना गळ घातली जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्यातरी पाकिस्तानातील राजकीय स्थिती धूसरच असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT