Saveera Prakash Sarkarnama
देश

Pakistan Elections : पाकिस्तानात घडणार इतिहास; पहिल्यांदाच हिंदू महिला उतरली निवडणुकीच्या रिंगणात

Rajanand More

Election News : पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात त्याची चर्चा होत असून त्या निवडून आल्यास इतिहास घडणार आहे. सवेरा प्रकाश असे त्यांचे नाव असून त्या बुनेर जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

पाकिस्तानात (Pakistan) 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचाही (PPP) समावेश असून सवेरा प्रकाश (Saveera Prakash) या याच पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यांचे वडील ओम प्रकाश (Om Prakash) हे 35 वर्षे PPP मध्ये सक्रिय होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सवेरा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानातील ‘डॉन’ वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानातील एक स्थानिक नेते सलीम खान यांनी याला दुजोरा दिला आहे. सवेरा प्रकाश यांनी आगामी निवडणुकीसाठी खुल्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या या जागेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या पहिल्या हिंदू महिला आहेत, असे खान यांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सवेरा प्रकाश यांनी एबटाबाद आंतरराष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला शाखेच्या त्या महासचिव आहेत. त्यांनी 23 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर वंचित घटकांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मानवतेची सेवा करणे आपल्या रक्तातच असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानमध्ये निवडणूक आयोगाने नुकत्याच कायद्यात केलेल्या सुधाऱणेनुसार खुल्या जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांना उमेदवारी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय असणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT