Narendra Modi, Vinesh Phogat Sarkarnama
देश

Vinesh Phogat : पंतप्रधान मोदींचा फोन आला होता, पण ‘त्या’ अटीमुळे बोलण्यास नकार दिला! विनेश फोगाटचा गौप्यस्फोट

PM Narendra Modi Paris Olympic 2024 : हरियाणातील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट विधानसभेची निवडणूक लढवत आहे.

Rajanand More

Haryana Assembly Election 2024 : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या प्रत्येक खेळाडूशी पंतप्रधान मोदींनी फोनवरून संवाद साधला. ते विनेश फोगाटशीही बोलणार होते. तसं नियोजनही झालं होतं. पण विनेशनेच पंतप्रधानांशी बोलण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. यामागचे कारणही तिने पहिल्यांदाच उघड केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना विनेशने हा गौप्यस्फोट केला आहे. विनेश हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघात काँग्रेसची उमेदवार आहे. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहचलेल्या विनेशला सामन्यापूर्वीच बाद ठरवण्यात आले. तिचे वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत राजकारणात प्रवेश केला.

ऑलिम्पिकमध्ये बाद केल्यानंतर देशभरात विनेशविषयी भावनिक वातावरण तयार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोनवरून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी बोलताना विनेश म्हणाली, पंतप्रधान मोदींचा फोन आला होता. पण बोलण्यास नकार दिला. थेट मला फोन आला नव्हता. मला अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधानांना बोलायचे आहे. मी बोलण्यासाठी तयारही झाले होते. पण अधिकाऱ्यांनी एक अट घातली.

मी पंतप्रधानांशी बोलत असताना तिथे माझ्या टीममधील कुणीही उपस्थित राहणार नाही. त्यांची दोन लोक इथे थांबतील आणि सोशल मीडियासाठी दोघांमधील संवाद रेकॉर्ड करतील, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे मी बोलण्यास नकार दिला. मला माझ्या भावना आणि कष्टाचे सोशल मीडियात मनोरंजनासाठी वापर करायचा नव्हता, असे विनेशने स्पष्ट केले.

कोणतीही अट न घालता पंतप्रधानांनी संवाद साधला असता, तर मला आनंद झाला असता, असेही विनेशने म्हटले आहे. त्यांना खेळाडूंची खरंच काळजी असते तर त्यांनी रेकॉर्डिंगची अट घातली नसती. आपण विनेशशी बोललो तर ती मागील दोन वर्षांत झालेल्या घटनेवर बोलेल, असे मोदींना जाणवले असावे. त्यामुळे त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यास मनाई केली. कारण त्यांनी त्यांचे रेकॉर्डिंग एडिट केले असते, मी ओरिजनल व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला असता, असा दावाही विनेशने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT