संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून यावेळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अधिवेशन सुमारे 3 आठवडे चालण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सामान्यतः पावसाळी अधिवेशन 4 आठवडे चालते आणि त्यात जवळपास 20 बैठका होतात. यंदा बैठकींची संख्या काहीशी कमी असू शकते, अशी चर्चा आहे.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. विविध पक्षांमधील अंतर्गत घडामोडी, खासदारांच्या गटबाजीचे प्रश्न आणि राजकीय समीकरणांमधील बदल यामुळे संसदेत जोरदार चर्चा आणि वादविवाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही पक्षांतील खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने संसदेतील संख्याबळाचे चित्र बदलताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 9 पैकी 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याशिवाय इतर काही पक्षांतील खासदारांच्या भूमिकेमुळेही सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यूबीटीच्या काही खासदारांच्या स्वतंत्र गट मान्यतेबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाचा संसदेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुन्हा एकदा महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मागील अधिवेशनात आवश्यक पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. मात्र यावेळी सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढल्यास विधेयक पुढे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
याशिवाय लोकसभा मतदारसंघांचे पुनर्रचना आणि जागावाढीबाबतही सरकार नवीन प्रस्ताव आणू शकते. मिळालेल्या माहितीनुसार सर्व राज्यांतील लोकसभा जागांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. त्यामुळे विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत निर्माण झालेल्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.