New Delhi : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावरून राज्यातील विरोधकांकडून सरकारला घेरले जात असतानाच आता दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा सोमवारी लोकसभेत उपस्थित केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सोनवणे यांनी पाच दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी लोकसभेतही बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला.
सोनवणे यांनी लोकसभेत बोलताना म्हटले आहे की, जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. माझ्या मतदारसंघातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्याची चौकशी करून खुन्याला फाशीची शिक्षा व्हावी. संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा.
याबाबत सोनवणे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आम्हाला न्याय हवाय. संतोष देशमुख यांच्या क्रूर खूनप्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी आज संसदेत मांडली. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा सोनवणे यांनी या पोस्टमधून दिला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी सोनवणे यांनी अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली होती. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही डोळ्यांसह डोके, पोट, छातीवर मारहाणीचे गंभीर व्रण उत्तरीय तपासणीत आढळून आले आहेत.
देशमुख यांचे सोमवारी (ता. 9) तीन वाजता टाकळी जवळील टोलनाक्यावरून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एका वाहनात नेऊन मारहाण झाली. त्यानंतर तीन तासांनी त्यांचा मृतदेह दैठणाजवळ टाकण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.