
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा विराजमान झाले ते अत्यंत दिमाखदार सोहळ्यात. हा सोहळा महायुतीला लाभलेल्या अभूतपूर्व यशाचा पुरावा तर होताच पण २७२ खासदार निवडून आणण्याची कामगिरी साधू न शकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जनता आहे हे दाखवणारा क्षण होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ फडणवीस घेत होते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना समवेत घेऊन, पण हा मोदींच्या राजवटीला अन् उजव्या विचारधारेला मिळालेला निर्णायक कौल होता. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत फडणवीस हे यश त्यांना अर्पण करत होते. ते प्रथम मुख्यमंत्री झाले ते मोदींच्या त्यांच्यावरील प्रेमामुळे. तो विश्वास सार्थ ठरवत मोदींच्या पारड्यात त्यांनी दहा वर्षांतच कठीण काळात निर्णायक यश टाकले होते. शिष्याने गुरुदक्षिणा दिली होती. २०१४ मध्ये फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाला या राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेता आली होती.
रुसलेली शिवसेना निवडणुकीत समवेत नव्हती, पण वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या शपथविधीला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे नंतर हजर झाले होते. त्यावेळी अवघ्या भारतातले वातावरण मोदीमय होते, ‘न खाऊंगा न खाने दूँगा’, ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ या सारख्या घोषणांकडे भारत कमालीच्या आशेने बघत होता. परिवर्तन आता पुढच्याच वळणावर आहे, या भावनेने देशावर मोहिनी घातली होती. उजवे, अति उजवे, मध्यममार्गी सारेच या अशा चित्रात आपापले रंग भरत होते. फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले होते ते या मोदीलाटेमुळे. मंचावर विरोधी पक्षांना स्थान होते. शपथेची औपचारिकता आटोपल्यावर मंचावरील प्रत्येकाशी मोदी हस्तांदोलन करत होते. अजित पवारही या विरोधी नेत्यात होते. सिंचन गैरव्यवहार तेव्हा चर्चेत होता. अजित पवार त्या गैरव्यवहाराच्या आरोपांचे नायक, त्यामुळे भाजपच्या दृष्टीने खलनायक होते. मात्र मोदींनी हस्तांदोलन केले तेव्हा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते एका राजकीय युगपुरुषाने आपला हात हातात घेतला आहे, याचे निदर्शक होते. मग २०१४ मध्ये शिवसेना स्वतःहूनच सरकारमध्ये सामील झाली.
महाराष्ट्रात अनेक प्रकल्प राबवले गेले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर देऊ केलेले, खिशातील राजीनामे खिशातच राहिले. विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. पण नंतर दिल्या-घेतल्या वचनांचे संदर्भ काढणे सुरू झाले. मग झाला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा बहुचर्चित दुसरा शपथविधी. पहाटेचा! अजित पवार यांच्यासमवेत ते थेट उपमुख्यमंत्री. पहाटेचे ते औटघटकेचे सरकार कोसळले. कोसळताना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मग त्यांचे सरकार कोसळले. पुन्हा नवी समीकरणे जन्माला आल्याने ते घडले होते. लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत चुकवावी लागली. मोदी ४०० पार तर पोहोचले नाहीच, पण २७२ हा बहुमताला आवश्यक आकडाही गाठू शकले नाहीत.
लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर साशंक वातावरणात विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे होते. लाडकी बहीण योजना, सर्व जातींसाठी महामंडळे अशा घोषणा प्रत्यक्षात येत होत्या. जबरदस्त मेहनत केली जात होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी डबल इंजिने धडधडत होती. निकाल लागला सुखद आणि अनपेक्षित. त्या पार्श्वभूमीवरच शपथ कोण घेणार हे ठरत होते. शिंदेंची मेहनत तर होतीच, पण महाराष्ट्राचा निकाल हा विचार परिवाराच्या शिस्तबद्ध मुशीतून झालेल्या प्रयत्नांचे फलित होता, दिल्लीला ते कळत होते. निमूटपणे पाच वर्षे पक्षादेश पाळणारे शिस्तबद्ध स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस या निकालाचे नायक होते. जनरेटा तयार होत होता अन् अभूतपूर्व आमदारसंख्येचे धनी फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार हे निश्चित झाले होते.
पण एकनाथ शिंदेही भाजपसाठी महत्त्वाचे होते. लोकसभेतील सरकार मित्रांच्या पाठिंब्यावर अवलंबून. सात खासदार असलेल्या एकनाथ शिंदेंना दुखावण्यात अर्थ नव्हता, भाजपला त्यांच्याबद्दल आदर होता. निकालांपूर्वी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप १०० आमदारांवर थांबली तर मुख्यमंत्रिपद पुन्हा शिंदेंकडे जाईल असे संकेत दिले होते. शिंदे अर्थातच त्या विधानावर भिस्त ठेवून होते. आम्हाला शब्द दिलाय असे शिंदे यांचे समर्थक नेते सांगत होते खरे, पण शंभरी ओलांडून १३३ पर्यंत आमदारसंख्या पोहोचली होती. एका विशिष्ट क्षणी निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, आता तुम्ही आमच्यासाठी दोन पावले मागे या असे सांगितले होते.
निकालांना दहा दिवस उलटून गेले होते, जनतेतील अस्वस्थता वाढत होती. भाजप शांत होता अन् शिंदे समजून चुकले होते की आपण नाही, फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. तरीही शिंदेंच्या आजूबाजूची माणसे वास्तव स्वीकारायला तयार नव्हती. मोदी-शाह यांचा आदेश मी पाळेन असे शिंदेंनी सांगितले तर होते, पण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबद्दल कोणताही निरोप मिळत नव्हता. अखेर फडणवीसांचे नेतृत्व मानणारे शिंदेंकडचे काही खास नेते कामाला लागले. समजावणे सुरू झाले. फडणवीस आपल्यासाठी सक्रिय झाले होते, शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात त्यांचा वाटा मोठा होता या सत्याची जाणीव करून देत आता त्यांच्या आनंदाच्या क्षणाला आपण सक्रिय होकार देणे आवश्यक असल्याचे काही निकटवर्तीय समजावून सांगत होते.
शिंदेंना हे सत्य मान्य होतेच, पण निकटवर्तीय काहीसा वेगळा दबाव आणत होते. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सहभागी होणे हे माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही, असं सांगणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर एका उत्तम कारकिर्दीनंतर उपमुख्यमंत्री होणे हे किती त्रासाचे असते याची मलाही कल्पना आहे अशी भावना व्यक्त केली होती. मैत्रीचा हा धागा आणि हे संवेदनशील बोल एकनाथ शिंदे यांना अंतिमतः महत्त्वाचे वाटले आणि शपथविधीला काही त्रास राहिले असताना त्यांनी आपण मंत्रिमंडळात राहणार हे स्पष्ट केलं होते. पक्षाला आणि कार्यकर्त्यांना काहीसा दिलासा मिळावा त्यांच्या भावनांना प्रतिसाद देत असल्याचा संदेश देता यावा यासाठी शिंदे यांनी काहीसा वेळ घेतला खरा, पण ती समजून-उमजून घेतलेली भूमिका होती. पक्षाला मोठे करायचे असेल तर अशा पद्धतीची तयारी हवी. समोरच्या मित्र पक्षालाही काही प्रमाणात आम्हाला बरोबरचे वागवा हे सांगायला हवे, अशी त्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी होती.
शपथविधीची वेळ आली त्यावेळेला अवघ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नजरा त्या समारंभाकडे होत्या. प्रचंड मोठा समारंभ करणे हे खरंतर फडणवीसांना मान्य नव्हते असे म्हणतात. मात्र अभूतपूर्व विजयाची व्याप्ती लक्षात घेता सोहळा देखणा व्हावा, महागडा नव्हे अशी हमी दिली जात होती. शपथविधी समारंभाची तयारी झाली. भारतीय जनता पक्षाची संपूर्ण ताकद आणि भारताच्या पटलावर असलेलं त्यांचं ‘राज्य’ या शपथविधी सोहळ्यात दिसत होते. अनेकविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अनेक केंद्रीय मंत्री शपथविधी समारंभाला हजर होते. लोकसभेच्या निकालांनी जो धक्का दिला होता, तो भरून काढण्याचे उत्तम काम महाराष्ट्राच्या निकालांनी केले होते. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तो अत्यंत आनंदाचा क्षण होता.
या क्षणाला खुद्द पंतप्रधान मोदी अत्यंत कृतज्ञ भावनेने सामोरे गेले. आझाद मैदानावर जमलेल्या सर्व नागरिकांना चारही दिशांमधून भारतीय जनता पक्ष सरकार कोणाचे आहे ते सांगायचा प्रयत्न करत होता. मोदी देखील प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा नमस्कार पोहोचेल हे बघत होते. असंख्य कॅमेरे प्रत्येक कोनात कृतज्ञ भावनांनी हात जोडणारे मोदी साठवत होते आणि जनतेपर्यंत ते चित्र पोचवत होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपण या घटनेचे नायक असलो तरी संपूर्ण श्रेय मोदींच्या पदरात टाकत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा पुन्हा एकदा केली होती.
वागणुकीतील नम्रता आणि एखादी गोष्ट झाल्यानंतर त्याचे संपूर्ण श्रेय घेण्यासाठी धडपड न करण्याची वृत्ती हे त्यांचे फार मोठे गुण आहेत. राज्यासमोरची आव्हाने फार मोठी आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यात फडणवीस यांचा कस लागणार आहे. गेली दहा वर्षे ते महाराष्ट्राच्या मुख्य नायकाच्या भूमिकेत असले तरी त्यांचा कोणताही प्रवास सहज सोपा नाही. अत्यंत कष्टसाध्य विजय मिळवणं हे त्यांच्या नशिबात लिहिलेले असावे. पूर्वी फडणवीसांना दहा डोळे नजरेखाली ठेवत असतील, तर त्यांच्या नेतृत्वात मिळालेल्या यशामुळे या लक्ष ठेवणाऱ्या नेत्यांची संख्या आता शंभरावर गेलेली आहे. ते काय करतील कसा कारभार चालवतील याकडे अनेक नजरा आहेत. महाराष्ट्राला आजवर पडत असलेलं पंतप्रधान पदाचे स्वप्न कदाचित काही वर्षांनी पूर्ण होणार असेल, तर तो मान देवेंद्र फडणवीस यांना मिळूही शकतो. त्यासाठी त्यांना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल.
अनेक नेत्यांना बरोबर घ्यावे लागेल. पक्षांतर्गत विरोधकांना आपण समवेत घेतो, संपवत नाही हा संदेश द्यावा लागेल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कमालीची मजबूत करावी लागेल. फडणवीसांसमोरची आव्हाने अत्यंत मोठी आहेत. या यशाने एक आशेचा किरण दिसत असला तरी तो प्रत्यक्षात येण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. महाराष्ट्राचे फेरवस्थापन नीट रीतीने करणे हे देखील फार मोठे आव्हान आहे. त्यासाठी त्यांना अजित पवार यांची भक्कम साथ मिळेल असे आत्ता दिसतेच आहे. परंतु काळाची आव्हाने पेलण्यासाठी उत्तम क्षमता तयार करणे अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना विश्वासात घेणे त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून दाखवणे हे ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखे आहे. पण येत्या काळामध्ये हे आव्हान कसे पेलतात त्यावर त्यांच्या, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्याही अस्मितेचे मुद्दे अवलंबून राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.