PM Narendra Modi Sarkarnama
देश

Parliament Winter Session : पंतप्रधान लोकसभेत आले, बसले, उभे राहिले आणि गेले!

Rajanand More

Lok Sabha Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन घुसखोरी आणि खासदारांच्या निलंबनावरून गाजत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती विरोधकांना चांगलीच खटकत होती. अखेर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी लोकसभेत हजेरी लावली. पंतप्रधानांचे सभागृहातील भाषण विरोधकांची खरडपट्टी काढणारे असते. पण आजचा दिवस आणि अधिवेशन त्याला अपवाद ठरले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान आले आणि 15 मिनिटांतच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

लोकसभेत (Lok Sabha) 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी घुसखोरी केली. या घटनेनंतर विरोधकांनी संसदेच्या (Parliament) दोन्ही सभागृहांत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उपस्थित राहून निवेदन देण्याची मागणी लावून धरली. विरोधकांकडून घोषणाबाजी आणि फलक दाखवल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला. परिणामी, आतापर्यंत तब्बल 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंत चालणार होते. पण घुसखोरी प्रकरणानंतर सरकारच्या निवेदनासाठी आक्रमक झालेले विरोधक, त्यानंतर विरोधी खासदाराचे विक्रमी निलंबन आणि बहुतेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाल्याने लोकसभेचे कामकाज एक दिवस आधीच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्याआधी 15 मिनिटांसाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती महत्त्वाची ठरली. घुसखोरीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान सभागृहात आले होते. गृहमंत्री अमित शाह बुधवारी लोकसभेत आले होते. पण त्यांनीही घुसखोरी किंवा निलंबनाच्या मुद्यावर काहीही भाष्य केले नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदींचे लोकसभेत आगमन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलत होते. पंतप्रधान येताच काही भाजप खासदारांनी टाळ्या वाजल्या, काहींनी 'जय श्रीराम'चा जयघोष केला तर काही खासदारांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान सर्वांना नमस्कार करत आपल्या आसनावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते.

त्यानंतर जेमतेम 10 मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार की नाही, याबाबत उत्सुकता असतानाच माहिती व प्रसारण मंत्रालयाचे एक विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर वंदे मातरम झाले, पंतप्रधानांनी नमस्कार केला आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

 (Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT