Madhabi Puri Buch Sarkarnama
देश

Madhabi Puri Butch : माधबी बुच यांच्यावर संसदीय समिती घेणार ‘अ‍ॅक्शन’; शेअर बाजार कोसळला...

Share Market SEBI Hindenburg Parliament Committee : हिंडनबर्गच्या आरोपांनंतर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत.

Rajanand More

New Delhi : शेअर बाजाराशी संबंधित दोन मोठ्या बातम्या शुक्रवारी समोर आल्या आहेत. हिंडनबर्गच्या आरोपांनंतर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांची संसदीय समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली असून सेंसेक्स तब्बल 950 अंकानी कोसळला आहे.

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी ही भारतातील भांडवली बाजारावर देखरेखीसाठी स्थापित देशातील एक महत्त्वाची नियामक संस्था आहे. शेअर बाजारावर या संस्थेचे नियंत्रण असते. हिंडनबर्गच्या आरोपांनंतर संस्थेच्या प्रमुख माधबी बुच चर्चेत आल्या आहेत. त्यांचे उद्योगपती गौतम अदानींच्या एका विदेशी फंडमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप झाला आहे. हे आरोप त्यांनी फेटाळले असले तरी काँग्रेसकडून त्यांच्या उत्पन्नाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आणि खासदार केसी वेणुगोपाल हे संसदेच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीकडून सेबीच्या कामाची समीक्षा केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अध्यक्ष बुछ यांना समन्स पाठवून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. समितीची 10 सप्टेंबरला बैठक आहे.

दरम्यान, एकीकडे सेबीच्या प्रमुखांबाबत हे वृत्त असताना शेअर बाजारही कोसळला आहे. मात्र, त्यामागची कारणे वेगळी आहेत. पुढील काही तासांत जाहीर होणारा अमेरिकेचा आर्थिक अहवाल त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक बड्या कंपन्यांचे शेअरही कोसळल्यानंतर संपूर्ण बाजारावर त्याचा परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे.

ग्लोबल मार्केट आणि मागील दोन दिवसांतील भारतीय शेअर बाजारातील उलाढालींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सेंसेक्स 950 अंकांनी कोसळला. तर निफ्टीही 25,000 अंकांच्या खाली गेला आहे. सकाळी 11.15 वाजता सेन्सेक्स 81,305 पर्यंत खाली गेला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील टॉप 30 शेअर्सपैकी केवळ चार शेअर ग्रीन झोनमध्ये होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर सर्वाधिक 3.37 टक्क्यांनी उतरले. 

एनडीपीसी, अदानी पोर्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि एचसीएलचे शेअरही सुमारे तीन टक्कांनी घसरले होते. बड्या कंपन्यांचे शेअर घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हा आकडा सुमारे चार लाख कोटींच्या जवळपास असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT