Kangana Ranaut Nishikant Dubey Jaya Bachchan Mahua Moitra  Sarkarnama
देश

Nishikant Dubey : जया बच्चन, महुआ अन् कंगना..! तिघींचं नेतृत्व करताना भाजपच्या ‘या’ खासदाराचा लागणार कस

Parliamentary Standing Committees Jaya Bachchan Mahua Moitra Kangana Ranaut : केंद्र सरकारने नुकत्याच 24 स्थायी समित्यांमध्ये सदस्यांची नियुक्ती केली आहे.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या महत्वाच्या स्थायी समित्यांमध्ये सदस्यांची दोन दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली. यातील एका समितीतील सदस्यांच्या नियुक्तीकडे पाहिले तर या समितीचे नेतृत्व करणाऱ्या भाजप खासदाराचा कस लागणार असल्याचे दिसते.

केंद्राच्या 24 स्थायी समित्यांपैकी एक असलेल्या माहिती तंत्रज्ञान समितीचे नेतृत्व म्हणजे अध्यक्ष भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांना करण्यात आले आहे. या समितीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत यांचाही समावेश आहे.

दुबे यांच्या तक्रारीनंतरच पैशांच्या बदल्यात प्रश्न या प्रकरणात महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. काही महिन्यांतच महुआ पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या. दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले आहे.

दुसरीकडे जया बच्चन याही आपली भूमिका सडेतोड मांडणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. संसदेच्या मागील अधिवेशनात राज्यसभेत जगदीप धनखड आणि त्यांच्यामध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मोठा गदारोळ झाला होता. हे प्रकरण चांगलेच तापले होते. संसदेबाहेरही सरकार-विरोधी पक्ष आमनेसामने उभे ठाकले होते.

भाजपच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. तीन कृषी कायदे पुन्हा आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यावरून भाजपने त्यांना फटकारले आहे. यापूर्वीही शेतकरी आंदोलनावरून त्यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे त्यांना यावर भाष्य न करण्याची तंबी पक्षाने दिली होती.

तिन्ही महिला खासदारांचा आक्रमक आणि सडतोड स्वभाव पाहता खासदार दुबेंना समितीचे कामकाज पार पाडताना मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे. समितीच्या बैठकांमध्ये महुआ यांच्याकडून त्यांना टार्गेट केले जाऊ शकते. त्यामुळे या तीन महिला खासदारांचा समावेश असलेल्या समितीचे नेतृत्व करताना दुबेंना कस लागणार, हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT