नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच राहिली असून, चालू महिन्यातील 20 दिवस दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा (Crude Oil) भडका उडाल्याने आता देशातील जनेतला बसणारे इंधन दरवाढीचे चटके वाढू लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 108.29 रुपये तर मुंबईत 114.14 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 97.02 रुपये आणि मुंबईत 105.12 रुपयांवर पोचला आहे.
देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. चालू महिन्यात पेट्रोल, डिझेलची दरात 20 दिवस वाढ झाली आहे.
देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतिकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.
पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे. यातच सरकारने एलपीजीवरील सबसिडीही बंद केल्याने सामान्यांची महागाईच्या आगीत होरपळ सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.