Jan Dhan accounts Sarkarnama
देश

Jan Dhan accounts : जनधन योजनेचा धक्कादायक आकडा; 59 कोटी खात्यांपैकी 15 कोटी निष्क्रिय

15.36 Crore Jan Dhan Accounts Inactive Across India : देशातील जवळपास चारपैकी एक जनधन खाते निष्क्रिय; महाराष्ट्रातील 97.94 लाख खाती निष्क्रिय, तर 36.04 लाख खात्यांमध्ये शून्य शिल्लक

Pradeep Pendhare

PM Jan Dhan Yojana latest data : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात गाजावाज करत सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेतील (PMJDY) बँक खात्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेद्वारे देशात एकूण खाती 59.03 कोटी खात्यापैकी 15.36 कोटी निष्क्रिय खाती आढळली आहेत.

म्हणजेच देशातील चार पैकी एक खाते निष्क्रिय आढळून आले आहे. महाराष्ट्रात असलेल्या 3.85 कोटी खात्यापैकी 36.04 लाख खात्यात शून्य बॅलेन्स आहे. तर 97.94 लाख निष्क्रिय आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील जनधन खात्यांमध्येही मोठ्या संख्येने खाती नियमित वापरात नसल्याचे दिसून येते.

प्रधानमंत्री (PM) जनधन योजनेतील देशभरातील प्रत्येक चारपैकी एक खाते निष्क्रिय असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. तसेच, 5 कोटी 72 लाखांहून अधिक खात्यांमध्ये शून्य शिल्लक असून, 12 ऑगस्टपर्यंत 59 कोटींहून अधिक जनधन खात्यांत एकूण 3.15 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होती.

देशातील एकूण जनधन खात्यापैकी 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य बॅलेन्स आहे. शून्य शिल्लक असलेली सर्वाधिक खाती उत्तर प्रदेश 95.92 लाख, बिहार 62.35 लाख, पश्चिम बंगालमध्ये 37.20 लाख, आसाममध्ये 36.30 लाख आणि महाराष्ट्र (Maharashtra) 36.04 लाख खात्यांमध्ये शून्य बॅलेन्स आढळला आहे.

निष्क्रिय खात्यांमध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश 3.23 कोटी आहेत. त्या खालोखाल बिहारमध्ये 1.59 कोटी, मध्य प्रदेश 1.35 कोटी, पश्चिम बंगालमध्ये 1.02 कोटी आणि महाराष्ट्रात 97.94 लाख खाती निष्क्रिय आहे. देशात सर्वाधिक जनधन खाते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तिथे 10.51 कोटी, बिहार 7.01 कोटी, पश्चिम बंगाल 5.73 कोटी, राजस्थानमध्ये 3.87 कोटी आणि महाराष्ट्र 3.85 कोटी खाते आहेत.

आर्थिक समावेशनासाठी महत्त्वाची योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये जनधन योजना सुरू करताना ती देशातील आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने महत्त्वाची योजना असल्याचे सांगितले होते. बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या नागरिकांना बँकिंग सेवांशी जोडणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सवर बँक खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली. खातेदारांना RuPay डेबिट कार्ड, त्यासोबत अपघाती विमा संरक्षण आणि पात्रतेनुसार 10,000 पर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यावर

याशिवाय विविध सरकारी योजनांचा निधी, पेन्शन आणि अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठीही जनधन खाती महत्त्वाची ठरली आहेत. मात्र, आता समोर आलेली आकडेवारी पाहता, मोठ्या संख्येने जनधन खाती निष्क्रिय राहणे आणि कोट्यवधी खात्यांमध्ये शून्य शिल्लक असणे हे आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीबाबत चर्चेचा विषय ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT