भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि उत्पादनक्षमता वाढावी या उद्देशाने केंद्र सरकार सतत विविध योजनामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत असते. त्यापैकी सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
मात्र, सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त असलेले देशभरातील शेतकरी या योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 11 ऑक्टोबर रोजी मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली असून त्यातून शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजनांचा शुभारंभ होणार आहे.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या योजना लाँच केल्या जाणार आहेत. दिल्लीतील पूसा संस्थेत होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पना व उपक्रमांची माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना मोफत बियाणे. ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) शेतकऱ्यांसाठी हायब्रिड आणि पारंपरिक दोन्ही प्रकारच्या बियाण्यांची मिनी किट्स उपलब्ध करून देणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, देशभरात 126 लाख क्विंटल प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील. तसेच 88 लाख मोफत बीज किट्स दिल्या जाणार आहेत. रब्बी हंगामापासूनच ही योजना सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांना स्वतःची शेती उत्पादने प्रक्रिया करता यावी यासाठी सरकार 1000 प्रक्रिया युनिट्स उभारणार आहे. प्रत्येक युनिटसाठी 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून. यामुळे ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्न दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल. सध्या अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळालेला असला, तरी महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकरी 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, मागील काही वर्षांच्या पद्धतीनुसार अशी अपेक्षा आहे की दिवाळीपूर्वीच पीएम किसानचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 2024 मध्ये 5 ऑक्टोबर रोजी हप्ता मिळाला होता तसेच 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला, तर 2023 मध्ये थोडा उशीर होऊन 15 नोव्हेंबरला पैसे आले होते. त्यामुळे यंदाही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मोठ्या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण देशभरातील 731 विज्ञान केंद्रे, 113 आयसीएआर संस्था, मंड्या आणि किसान समृद्धी केंद्रांमध्ये होणार आहे. या माध्यमातून सव्वा कोटीहून अधिक शेतकरी थेट कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत.