PM Modi_ Jagdeep Dhankhad 
देश

Jagdeep Dhankhar: पंतप्रधान मोदीही नव्हते खूश! नड्डा-रिजिजूंचं राजीनाम्यापूर्वी धनखड यांच्याशी काय बोलणं झालं?

Jagdeep Dhankhar: धनखड यांनी राजीनामा का दिला असेल? याबाबत विविध तर्क सांगितले जात आहेत. पण त्यातही तथ्य असावं अशा काही घडामोडी घडल्या आहेत.

Amit Ujagare

Jagdeep Dhankhar: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यामागे त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं कारण सांगितलं असलं तरी विरोधकांचं यामुळं समाधान झालेलं नाही. आता त्यांनी राजीनामा का दिला असेल याबाबत विविध तर्क सांगितले जात आहेत. पण त्यातही तथ्य असावं अशा काही घडामोडी घडल्या आहेत. सोमवारी रात्री जगदीप धनखड यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी भाजपच्या दोन वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी संपर्क साधल्याचं वृत्त आहे.

नड्डा-रिजिजूंनी केली चर्चा

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राज्यसभेचे खासदार जेपी नड्डा आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी धनखड यांच्याशी चर्चा केली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगासाठी विरोधी पक्षानं पुरस्कृत केलेल्या नोटिशीला सभापती म्हणून धनखड यांनी मंजुरी दिल्यानं या दोन नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यांपैकी रिजिजू यांनी धनखड यांना सांगितलं की, त्यांच्या या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नापसंती दर्शविल्याचं सांगितलं. पण यावर ७४ वर्षीय धनखड यांनी आपण सभागृहाच्या नियमांनुसार काम करत आहोत, असं उत्तर त्यांना दिलं.

महाभियोगाची सुरुवात लोकसभेतून होणार होती

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्या. वर्मा यांना हटवण्याची प्रक्रिया ही आधी लोकसभेतून सुरु व्हावी अशी सरकारची इच्छा होती. कारण लोकसभेत या महाभियोग प्रस्तावावर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सही केली होती. यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या प्रस्तावावर न्यायाधिशांना हटवण्याची मागणी कोणत्या कारणास्तव केली गेली आहे. याच्या चौकशीसाठी एक वैधानिक समिती स्थापण करण्याची घोषणा करणार होते. त्यानंतर त्याचा अहवाल मागवून त्यानुसार कारवाई करायची की नाही हे निश्चित होणार होतं. लोकसभेत ही प्रक्रिया सुरु होऊन नंतर ती राज्यसभेत जाणार होती, पण तत्पूर्वीच धनखड यांनी आधी राज्यसभेतच विरोधकांचा न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड नाराज झाले त्यातूनच धनखड यांना तातडीनं राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं, असंही सुत्रांच्या हवाल्यानं कळतं असल्याचं विविध वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

राजीनाम्यामागे खोल कारणं

राज्यसभेच्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीच्या सोमवारी दुपारी १२:३० वाजता झालेल्या या बैठकीत धनखड यांच्यासोबत या नेत्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर याच दिवशी दुपारी ४.३० वाजता पुन्हा झालेल्या दुसऱ्या बैठकीला मात्र धनखड यांनी हजेरी लावली नाही. यानंतर त्यांनी थेट रात्री साडेनऊ वाजता सोशल मीडियावरुन आपला लिखित राजीनामा शेअर केला. जो त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं पाठवून दिला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचं कामकाज पूर्ण केल्यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं धनखड यांच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि त्यांच्या राजीनाम्यामागं 'खूप खोल कारणं' असल्याचं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT