New Delhi News : दिल्लीत भाजपनं आम आदमी पार्टीची गेल्या 10 वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून टाकली. भाजपनं 70 पैकी तब्बल 48 जागा मिळवत अरविंद केजरीवालांच्या हातून सत्ता हिरावली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या आनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपकडून राजधानी दिल्लीतील विजयाचा संपूर्ण देशभरात आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात थेट महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव घेतलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील ऐतिहासिक यशानंतर शनिवारी (ता.8) भाजपच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यात पहिल्याच भाषणात मोदींनी दि्ल्लीतील विकासाचा अजेंडा बोलून दाखवतानाच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपवर टीकेची तोफ डागली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात थेट समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव घेतलं.
मोदी म्हणाले, आम आदमी पक्ष हा आम्ही राजकारण बदलून टाकणार म्हणत राजकारणात आले होते. पण ते तर कट्टर बेईमान निघाले. मी आज वरिष्ठ महानुभाव श्रीमान अण्णा हजारे यांचं विधान आठवत होतो. अण्णा हजारे (Anna Hazare) हे गेले कित्येक वर्षांपासून या आपवाल्यांची दुष्कृत्यांची पीडा झेलत होते. त्यांनाही आज या 'आप'दावाल्यांच्या दुष्कृत्यापासून मुक्ती मिळाली असेल असं म्हणत पंतप्रधानांनी केजरीवालांवर शाब्दिक हल्ला चढवला.
दिल्लीकरांनी कधीच भाजपला निराश केलं नाही. हरियाणा,महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत नवा इतिहास लिहिला गेल्याचं म्हणत या निवडणुतील विजयाचं वर्णन केलं.दिल्लीकरांनी दिल्लीचं मालक बनू पाहणाऱ्यांना घरी बसवल्याचा टोलाही मोदींनी यावेळी अरविंद केजरीवालांना लगावला.
पीएम मोदी म्हणाले, दिल्लीच्या विजयाने अराजकता,अहंकार आणि आपदा यांचा शेवट झाला आहे. दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे,आज दिल्लीने विकास,दृष्टिकोन आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज अराजकता,अहंकार आणि दिल्लीवरच्या आपदा यांचा पराभव झाला आहे. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिल्लीकरांना वंदन करत मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवल्याची भावना व्यक्त केली. पण मी दिल्लीकरांना विश्वास देऊ इच्छितो की,तुमचं प्रेम विकासाच्या रुपाने तुम्हाला परत देऊ. दिल्लीकरांनी आम्हाला प्रेम दिलं,विश्वास दाखवला. हे कर्ज दिल्लीचं डबल इंजिन सरकार चुकवणार असून आजचा विजय हा ऐतिहासिक विजय असल्याचंही ते म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच अरविंद केजरीवालांवर टीका केली होती. ते म्हणाले, पक्ष काढण्याच्या आधीपर्यंत माझं केजरीवालांशी बोलणं होत होतं. परंतु त्यांनी पक्ष आणि पार्टी काढली, तेव्हापासून मी बोलणं बंद केलं आहे. पण ते आले, त्यांनी पाहिलं, ऐकलं पण केलं नाही. म्हणून आज भोगावं लागलं. मी आधीच सांगितलं होतं, पक्ष अन् पार्ट्यातून सेवाभाव जोपर्यंत बाजूला जाईल,तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही असंही हजारेंनी टीका करताना म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.