Karnataka BJP MLA Sarkarnama
देश

BJP MLA : SIR वरून वाद पेटला असतानाच भाजप आमदारावर गुन्हा; जिवंत मतदारांना मृत दाखवत नावे वगळण्याचा होता प्लॅन? कर्नाटकात खळबळ!

Police Case Against BJP MLA Basanagouda Patil Yatnal : देशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) राजकीय वातावरण तापले असतानाच कर्नाटकमधील भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Karnataka Political News : भाजपचे विजयपुरा मतदारसंघातील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे टीका झाली होती. सोन्याच्या तस्करी प्रकरणात चर्चेत आलेल्या अभिनेत्री रान्या राव हिच्याबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता मतदार यादीशी संबंधित एका प्रकरणामुळे आमदार पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत.

जिवंत असलेल्या आठ मतदारांना मृत दाखवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी केल्याचा आरोप आमदार पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी विजयपुरा शहरातील बागवान कॉलनी येथील रहिवासी अब्दुल रझाक मौलासाब यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी यत्नाळ यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

आमदार लेटरहेडचा वापर?

तक्रारदार अब्दुल रझाक मौलासाब यांच्या म्हणण्यानुसार, ते स्वतः जिवंत असतानाही त्यांच्यासह अन्य काही जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आले. या व्यक्तींच्या नावाने बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ३ सप्टेंबर रोजी ही कथित मृत्यू प्रमाणपत्रे विजयपुरा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सादर करण्यात आली होती. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित आठ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा अर्ज आमदारांच्या अधिकृत लेटरहेडवर सादर करण्यात आल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. या आरोपांमुळे मतदार यादीतील नोंदींची सत्यता आणि जिवंत मतदारांची नावे वगळण्याच्या कथित प्रयत्नाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तीन महिला प्रत्यक्ष समोर

या प्रकरणाला आता आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. कागदपत्रांमध्ये मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या महिला प्रत्यक्षात जिवंत असून त्यांनी सार्वजनिकरीत्या समोर येत आपल्या नावांचा कथित मृत मतदारांच्या यादीत समावेश कसा झाला, असा सवाल उपस्थित केला आहे.

या घडामोडींनंतर संबंधित कागदपत्रे कशी तयार करण्यात आली, ती कोणी सादर केली आणि मतदार यादीतून नावे वगळण्याच्या मागणीमागे नेमका काय उद्देश होता, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटकच्या राजकारणात खळबळ

मतदार यादीतील कथित फेरफाराच्या या प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT