Arvind Kejriwal & Bhagwant Mann
Arvind Kejriwal & Bhagwant Mann Sarkarnama
देश

केजरीवालांनी डावललं अन् मुख्यमंत्री म्हणतात, मीच जबाबदार!

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) सत्ता मिळवली असून, मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी जोरदार काम सुरू केले आहे. असे असले तरी ते अडचणीत आले आहेत. याला कारण आहेत आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal). कारण केजरीवालांनी थेट पंजाबमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत मान यांच्या अनुपस्थितीत घेतल्याने गदारोळ उडाला आहे. आता या प्रकरणी मान यांना अखेर जाहीर खुलासा करावा लागला आहे. (Arvind Kejriwal News)

पंजाबमध्ये आपचे रिमोट कंट्रोल सरकार आहे, अशी ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. यावर अखेर मुख्यमंत्री मान यांनी खुलासा केला आहे. केजरीवाल यांच्यासोबत बैठकीसाठी मीच अधिकाऱ्यांना दिल्लीला पाठवले होते, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्यासोबत बैठकीसाठी पंजाबमधील अधिकाऱ्यांना मी पाठवले होते. त्यांना प्रशिक्षणाच्या हेतूने पाठवले होते. वेळ पडल्यास प्रशिक्षणासाठी मी अधिकाऱ्यांना गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतही पाठवेन. एवढेच काय त्यांना इस्त्राईललाही पाठवेन. याला आक्षेप घेण्याचे कोणाला काही कारण नाही.

केजरीवाल यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या अनुपस्थितीत घेणे घटनाबाह्य असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यामुळे मुख्यमंत्री मान अडचणीत आले आहेत. पंजाबमध्ये रिमोट कंट्रोल सरकार असल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबमधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा दावाही विरोधकांनी केला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवत आपने सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. केजरीवाल यांनी मंत्र्यांनाही कामांसाठीचे उद्दिष्ट्य निश्चित करून दिले आहे. केजरीवाल यांच्याच आदेशानुसार हे करण्यात आले होते. आता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला करून स्वत:च सूत्रे हाती घेतली आहेत. केजरीवालांनी पंजाब वीज महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि ऊर्जा सचिव उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री मान हेच या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यामुळे गदारोळ उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT