Dearness Allowance hike 2026 Sarkarnama
देश

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीत पगार वाढणार! पंजाब सरकारने केली DA मध्ये थेट 8 टक्के वाढ

Punjab Government Employees: वाढीव DA चा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर टप्प्याटप्प्याने दिसणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहिली ४ टक्के वाढ सप्टेंबरच्या वेतनात लागू होईल.

Mangesh Mahale

चंदीगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महत्त्वाचा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पंजाब सरकारने महागाई भत्त्यात (DA) एकूण ८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA आता ४२ टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. ही वाढ एकाच वेळी न देता दोन टप्प्यांत प्रत्येकी ४ टक्के करण्यात येणार आहे.

वाढीव DA चा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर टप्प्याटप्प्याने दिसणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहिली ४ टक्के वाढ सप्टेंबरच्या वेतनात लागू होईल, तर आणखी ४ टक्के वाढ ऑक्टोबरच्या पगारात मिळणार आहे. सप्टेंबरचा पगार १ ऑक्टोबरला जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांना पहिल्या वाढीचा लाभ त्याच वेळी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय समोर आला. बैठकीनंतर मंत्री अमन अरोरा यांनी कर्मचारी नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत DA वाढीची माहिती दिली. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ४ लाख सरकारी कर्मचारी आणि ३.५ लाख पेन्शनधारकांना होणार असल्याचे वृत्त आहे. DA वाढीमुळे सरकारी तिजोरीवर अंदाजे २५० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

दरम्यान, कर्मचारी संघटनांसोबतच्या चर्चेत केवळ महागाई भत्त्यापुरता विषय मर्यादित राहिला नाही. १७ जुलै २०२० नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनमान, प्रोबेशन कालावधीतील वेतन, जुनी पेन्शन योजना (OPS), २०० रुपयांचा प्रोफेशनल टॅक्स, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संगणक शिक्षकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली.

मिड-डे मील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मुद्दाही संघटनांनी बैठकीत उपस्थित केला. या विविध प्रश्नांवर सरकारकडून पुढील चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

मात्र, DA थकबाकीचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नाही. त्यामुळे सध्या जाहीर झालेली ८ टक्के DA वाढ म्हणजे पूर्वीची संपूर्ण थकबाकी मिळणार, असा अर्थ होत नाही. थकबाकीसह न्यायालयीन आणि इतर प्रलंबित मागण्यांवर पुढील काळात चर्चा सुरू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT