

जयपूर: राजस्थानमध्ये ९ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर, सभापती आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. एका नगरसेवकाच्या अटक खटल्यात न्यायालय मध्यरात्री सुरु होते. सुनावणीत नगरसेवकाच्या अटकेला स्थगिती देण्यात आली.
बीकानेर महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान उच्च न्यायालयाने रविवारी मध्यरात्री विशेष सुनावणी घेत नवनिर्वाचित नगरसेवक मकसूद अहमद यांना अंतरिम दिलासा दिला. अहमद यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली.
राज्याच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच रात्री १२ वाजता उच्च न्यायालयात अशा प्रकारे विशेष खंडपीठाची सुनावणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुनावणी रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत सुरू होती.
बीकानेर महापौरपदाची निवडणूक आज (सोमवारी ) होणार असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. बीकानेर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधून निवडून आलेले मकसूद अहमद यांनी अटकेची शक्यता व्यक्त करत रविवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर प्रकरणाची तातडी लक्षात घेऊन न्यायालयाने मध्यरात्री सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणातील एफआयआर सुमारे दोन महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आली होती. सरकारी दवाखान्यातील शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप अहमद यांच्याविरोधातील तक्रारीत करण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी कोटगेट पोलिस ठाण्याकडून त्यांना साक्षीदार म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायमूर्ती सुनील बेनीवाल यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अधिवक्ता कौशल गौतम यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती, तर ज्येष्ठ अधिवक्ता सचिन आचार्य यांनी उच्च न्यायालयात अहमद यांची बाजू मांडली. सुनावणीनंतर न्यायालयाने अटकेवर अंतरिम स्थगिती दिली.
दरम्यान, राजस्थानमध्ये केवळ बीकानेरच नव्हे, तर अन्य ठिकाणीही निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अटकेच्या मुद्द्यावर सुट्टीच्या दिवशी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. रविवारी दिवसभर नागौर आणि श्रीगंगानगर येथील नगरसेवकांच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालय गठित केले होते. दोन्ही प्रकरणांत नगरसेवकांच्या अटकेला स्थगिती मिळाली. बीकानेर आणि हनुमानगडमधील नगरसेवकांच्या प्रकरणांवरही मध्यरात्री सुनावणी झाली.
सोमवारी राज्यातील ३०५ नगर परिषदांमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. यापैकी ३२ ठिकाणी निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित २७३ नगरीय संस्थांमध्ये मतदान होणार आहे. जोधपूर, जयपूर, कोटा महापालिका तसेच सुकेत नगरपालिकेतील काही प्रभागांत फेरमतदान असल्याने तेथील अध्यक्षपदाची निवडणूक २५ सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने पूर्ण ताकद लावली असून, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.