Congress Internal Politics : राहुल गांधी यांनी पक्षात नवे चेहरे पुढे आणण्याचा धडाका सुरू ठेवत मध्य प्रदेशातून ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी नटराजन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, शेवटच्या टप्प्यात घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे हा संपूर्ण डाव उलटला आणि आता या प्रकरणामागची ‘इनसाइड स्टोरी’ राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एकेकाळी काँग्रेसमध्ये जुने नेते नेहमी म्हणायचे, ‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते.’ मीनाक्षी नटराजन प्रकरणामुळे हाच अनुभव आता थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाही आल्याची चर्चा सुरू आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील लाटेमुळे सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला होता. पक्षाचं भविष्य अंधारात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी आक्रमक रणनीती आखत काँग्रेसला नवसंजीवनी दिली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असं वातावरण असतानाही काँग्रेसने जोरदार पुनरागमन करत राष्ट्रीय राजकारणात स्वतःची ताकद पुन्हा दाखवून दिली.
या निकालानंतर राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते बनले, तर प्रियंका गांधी यांच्या सक्रिय संसदीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. पक्षात निर्णय घेण्याची संथ परंपरा मोडत राहुल गांधी यांनी वेगवान आणि धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, दिग्विजय सिंह, कमल नाथ, आणि अशोक गेहलोत यांसारख्या प्रभावशाली नेत्यांना डावलण्याची हिंमत पूर्वी कुणी दाखवली नव्हती. मात्र राहुल गांधी यांनी हा पॅटर्न बदलत मीनाक्षी नटराजन यांचं नाव राज्यसभेसाठी पुढे केलं.
याच निर्णयानंतर काँग्रेसमधील काही दिग्गज नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, तेलंगणामधील एका कायदेशीर प्रकरणासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिग्विजय सिंह यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर हीच माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यापर्यंत पोहोचली आणि घटनांनी वेग घेतल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
यामुळे मीनाक्षी नटराजन यांच्या राज्यसभा उमेदवारीवरच गंडांतर आलं. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तेलंगणातील न्यायालयीन नोटीस नमूद न केल्याचा ठपका ठेवत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे, मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात कोणतीही थेट पोलिस तक्रार दाखल झालेली नाही. मात्र हैदराबाद येथील फोर्थ अॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात एका खासगी तक्रारीच्या आधारे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
तक्रारदार या हैदराबादमधील काँग्रेसच्या माजी महिला नगरसेविका असून त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यावर गैरवर्तन आणि विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत. मीनाक्षी नटराजन या तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रभारी असल्याने त्यांनाही या प्रकरणात पक्षकार करण्यात आले.
मीनाक्षी नटराजन यांच्यावर थेट आरोप नसले तरी त्यांच्याविरोधात कलम 61, 45 आणि 46 अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आरोप असा की, पक्षातील जबाबदार पदावर असूनही त्यांनी मुख्य आरोपीला संरक्षण दिलं आणि संपूर्ण प्रकरणात अप्रत्यक्ष साथ दिली.
याच न्यायालयीन नोटिशीने अखेर त्यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि राहुल गांधींचा महत्त्वाचा राजकीय निर्णय शेवटच्या क्षणी कोलमडल्याची चर्चा आता दिल्लीपासून भोपालपर्यंत रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर एकच प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसमध्ये बाहेरील विरोधकांपेक्षा अंतर्गत राजकारणच अधिक घातक ठरत आहे का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.