Ibrahim’s Claims on Vote Buying in 2018 Elections : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर आरोप करत वोट चोरीचा मुद्दा चांगलाच तापवला आहे. एकीकडे संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्ष त्यावरून रान उठवत असताना कर्नाटकात मात्र राहुल यांना धक्का देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकापाठोपाठ एक अशा सिध्दरामय्या यांच्या दोन नेत्यांनी वादग्रस्त विधाने करत खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यापर्यंत ही लिंक पोहचली आहे. कालच के. एन. राजण्णा यांनी केलेल्या विधानामुळे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ सुरू असताना आपले सरकार त्याकडे केवळ बघत राहिले, असे विधान राजण्णा यांनी केले होते. त्यानंतर आता सिध्दरामय्या यांचेच जुने विश्वासू सहकारी सी. एम. इब्राहिम यांनी बॉम्ब टाकला आहे. भाजपचे खासदार लहर सिंह सिरोया यांनी असा दावा करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठविले असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इब्राहिम यांच्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 2018 च्या विधानसभा निवडणुकीतील आहे. सिध्दरामय्या यांच्या बदामी मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान तीन हजारे मते खरेदी करण्यात आली होती, असा दावा माजी केंद्रीय मंत्री इब्राहिम यांनी केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते बी. बी. चिम्मनकुट्टी आणि आपण मिळून त्यासाठी मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिध्दरामय्या यांच्या विजयासाठी हे केल्याचे इब्राहिम यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या निवढणुकीत सिध्दरामय्या यांचा केवळ 1 हजार 696 मतांनी विजय झाला होता. त्याचवेळी नोटाला मिळालेली मते 2 हजार 7 एवढी म्हणजे मताधिक्यापेक्षा जास्त होती. त्यामुळे इब्राहिम यांच्या दाव्याला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
इब्राहिम यांच्या म्हणण्यानुसार, ‘मतांच्या खरेदीसाठी खुद्द सिध्दरामय्या यांनीच पैसे दिले. पण ही रक्कम देण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.’ इब्राहिम यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. आता भाजपने या दाव्याची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणीच केली आहे. पक्षाचे खासदार लहर सिंह सिरोया यांनी इब्राहिम यांचे विधान गंभीर असल्याचे म्हटले आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सिरोया यांनी 2006 मधील चामुंडेश्वरी पोटनिवडणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निवडणुकीत सिध्दरामय्या केवळ 257 मतांनी विजय झाले होते. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना मते खरेदी केली होती का, कोणत्या अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली, याचा शोध घ्यायला हवा, असे सिरोया यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल यांच्या वोट चोरीच्या आरोपांना ‘सेल्फ गोल’ म्हटले आहे. या मुद्द्याचे भांडवल करत भाजपकडून राहुल यांच्यावर पलटवार केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.