Ayodhya Ram Temple: हिंदुस्थानातील करोडो राम भक्तांच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरातील हुंडीच्या रकमेचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. अनेक वर्षांचा लढा, करसेवकांच्या प्राणांची आहुती दिल्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य असे मंदिर उभे राहिले. प्रभू रामाचा वनवास संपला अशाच भावना प्रत्येक हिंदूच्या मनात होत्या. अयोध्येतील या मंदिराकडे प्रत्येक हिंदू आणि रामभक्त गर्वाने अभिमानाने पाहतो. मात्र रामभक्तांच्या सढळ हस्ते होणाऱ्या दानावरही काही लोक डल्ला मारत आहेत.
राम मंदिरातील हुंडीतील पैशांचा गैरव्यवहार समोर आल्यानंतर समस्त रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यात अनेकांची नावे समोर येत असली तरी ज्या प्रभू श्रीरामांच्या नावाने भाजपने केंद्रात सिंहासन आणि सत्ता मिळवली ते सत्ताधारी, देशाचे पंतप्रधान आणि ज्या उत्तर प्रदेश राज्यात प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर आहे तेथील सरकार तोंडातून एकही शब्द काढायला तयार नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर प्रदेश सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा समाचार घेणारी पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली आहे.
राज ठाकरे म्हणतात, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतु प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पाहत होतो.
या विषयवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का? अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, कारसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य कारसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
रामावर फक्त भाजपाचा विशेष अधिकार?
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि कारसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्यबाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान) या लोकांच्या पदरात टाकू नका!
आधी परकीयांनी लुटले आता हिंदूच मंदिर लुटत आहेत?
भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे. आधी परकीयांनी हजारो वर्षे इथली मंदिरं लुटली आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही? का अयोध्येत ऐवढा आटापिटा करून निवडणुकीच्या तोंडावर ( उद्घाटन ) करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही म्हणून याकडे दुर्लक्ष? अर्थात नेहमी प्रमाणे यांत पण शह - काटशहाचे राजकारण सुरु आहे. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षांना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात 'पुढे कोण' यावरून जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात. अगदी खासदार, आमदार फोडाफोडी पासून ते मंदिरांपर्यंत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचे कारणच नाही.
लोकांच्या श्रद्धेला जो तडा गेला आहे त्याचा हिशोब हिंदू जनतेला मिळाला पाहिजे. हे सगळं होत असताना ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पंतप्रधानांचे हेतू किमान या बाबतीत अजून तरी स्वच्छ आहेत असं मी मानतो, पण फक्त हेतू स्वच्छ असून उपयोग नाही तर तुमच्याकडून कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमच्या पक्षाने पुन्हा एकदा सिंहासनाच्या मोहापायी रामाला वनवासात आणि राम भक्तांना शरयू नदीत ढकललंत असंच म्हणावं लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.