Rajasthan BJP Leader Dr Jaswant Yadav Passes Away Sarkarnama
देश

BJP Leader Passes Away : दिवाळीच्या दिवशीच भाजपवर शोककळा! माजी कॅबिनेट मंत्र्याचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

BJP Leader Dr Jaswant Singh Yadav Passes Away : राजस्थानमधील बेहरोरचे विद्यमान भाजप आमदार आणि राज्य सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री डॉ. जसवंत सिंह यादव यांचे रविवारी सकाळी जयपूरमध्ये निधन झाले. येथील महात्मा गांधी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Aslam Shanedivan

Rajasthan News : राजस्थानमधील बेहरोर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आणि राजस्थान सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. जसवंत यादव यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. जयपूर येथे सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती पुत्र मोहित यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांच्या निधनामुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मोहित यादव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली. बेहरोरचे विद्यमान आमदार, राजस्थान सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री आणि अलवरचे माजी खासदार अशी त्यांची ओळख होती. प्रेमळ स्वभाव, साधेपणा आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. यादव यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अलवर येथील जसवंत नगरमधील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजता तिजारा जिल्ह्यातील खैरथल परिसरातील त्यांच्या मूळ गावी शिल्पाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडून शोक व्यक्त

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी डॉ. जसवंत यादव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी यादव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले. तसेच शोकाकुल कुटुंबीय आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. यादव यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते

डॉ. जसवंत यादव यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली. १९९८ मध्ये मुंडावर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये अलवर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. २०१६ ते २०१८ या काळात वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते एकूण चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते.

राजकीय गणित बदलणार

डॉ. जसवंत यादव यांच्या निधनामुळे बेहरोर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे राजस्थान विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या २०० वरून १९९ झाली आहे. नियमानुसार रिक्त झालेल्या या जागेसाठी पुढील सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बेहरोर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT