Vijaya Rahatkar Sarkarnama
देश

Vijaya Rahatkar : राजस्थानातील भाजपच्या 'विजया'त रहाटकर ठरल्या महत्त्वाची भूमिका निभावणारा मराठी चेहरा!

Mayur Ratnaparkhe

Rajasthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड देत, अभूतपूर्व विजय मिळला. या विजयामागे खरंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते भाजपच्या अगदी केंद्रीय नेतृत्वाचेही योगदान आहे. परंतु राजस्थानमध्ये भाजपच्या विजयात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये एका मराठी चेहऱ्यानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तो चेहरा म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर (Vijaya Rahatkar).

ज्यांना भाजपने राजस्थानच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. राजस्थानमध्ये भाजपच्या विजयावर त्यांनी 'सरकारनामा'ला प्रतिक्रिया देताना, गेहलोत सरकारवरही निशाणा साधला आहे.

विजया रहाटकर म्हणाल्या, ''सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये आता भाजपचं सरकार बनतं आहे, याचा खूप आनंद आहे. आम्हाला याचा अंदाज होताच की, आम्ही इथे नक्कीच सरकार बनवत आहोत. याच कारण आहे की, भाजपच्या केंद्रातील सरकारने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लोकांच्या सेवेचं अतिशय उत्तम काम केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''राजस्थानमध्ये मी वर्षभरापासून प्रदेश सहप्रभारी म्हणून जी मेहनत घेतली 200 पैकी 160 विधानसभा मतदारसंघात जाऊन आले. त्या सर्व कष्टाचं, धावपळीचं सार्थक झाल्याचं समाधान वाटतं आहे. अशोक गेहलोत सरकार त्याचा कर्माने जाणारच होतं आणि जनतेनेही ते निश्चितच केलं होतं. त्या जनतेचा आवाज होण्याचं काम आम्हाला करावं लागलं आणि ते आम्ही यशस्विपणे केलं, याचा आम्हाला निश्चितच आनंद होत आहे,'' अशा शब्दांमध्ये विजया रहाटकर यांनी भावना व्यक्त केल्या.

विजया रहाटकर यांच्याकडे आधी दमण दीव प्रभारी पदाची जबाबदारी होती. तेथे पंचायत, जिल्हा पंचायत तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये वर्षानुवर्षी असलेली काँग्रेसची सत्ता भाजपने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणली. त्यानंतर विजया रहाटकरांकडे जवळपास 200 विधानसभा मतदारसंघ असलेल्या राजस्थानसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी सहप्रभारी म्हणून भाजपने सोपविली होती.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असणाऱ्या राजस्थानच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विजया रहाटकरांवर मोठा विश्वास टाकला होता. त्यांनीही पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि राजस्थानमधील जवळपास सर्वच जिल्हे भाजपच्या प्रचारासाठी अक्षरशः पिंजून काढले.

160 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष पोहाेचल्या -

राजस्थानमधील 160 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये त्या प्रत्यक्ष पोहाेचल्या. मराठी चेहरा असूनही त्यांनी राजस्थानातील स्थानिक नेत्यांच्या बरोबरीने काम केले. काही ठिकाणी तर स्थानिक नेतेही पोहाेचले नव्हते, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला. सामान्य कार्यकर्ता आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद आणि समन्वय त्यांनी घडवून आणला.

अशोक गेहलोतांचा गडात होत्या तळ ठोकून -

याशिवाय बूथ समित्या सक्षम करणे, भाजपच्या महिला, युवा, ओबीसीसह विविध मोर्चांकडून चांगले काम करवून घेतले. पक्षांतर्गत बारीकसारीक मतभेद मिटवले. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात महिलांवर कशाप्रकारे अत्याचार आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले हे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहाेचवले.

एवढंच नाही तर त्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गड असलेल्या जोधपूरमध्ये तळ ठोकून होत्या. परिणामी या ठिकाणच्या 33 पैकी 24 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. 2018 मध्ये ही संख्या अवघी 11 होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT