कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी देशभरात सरकारी शाळांची पाहणी करत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये या मोहिमेला स्थानिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी विरोधाचाही सामना करावा लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी राजस्थानमध्ये घडला.
राजस्थानातील रामपुरा-कंवरपुरा गावातील शाळेची पाहणी करण्यासाठी सीजेपीचे सह संयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका आपल्या सहकाऱ्यांसह जात होते. ही शाळा अनेक वर्षभरापासून गोठ्यात सुरू असल्याचा दावा केला जात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ही टीम जात असताना आधीच एकत्रित आलेल्या काही ग्रामस्थांनी त्यांना रोखले. त्यांना तिथून माघारी जाण्यास सांगत असताना धक्काबुक्की सुरू झाली.
काही गावकऱ्यांनी थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. रांका यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनाही त्यांच्या मागे धावत जाऊन मारण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. याबाबत बोलताना रांका यांनी सांगितले की, टीम शाळेमध्ये जाण्याआधीच तिथे काही लोक जमा झाले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली.
दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. मोबाइलचेही नुकसान केले. एका महिलेलाही धक्काबुक्की केली. एका सहकाऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचा दावा रांका यांनी केली. दरम्यान, रांका यांनी राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांना केल्याचा दावा करत ते म्हणाले, संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा सीजेपीकडून संपूर्ण राजस्थानमध्ये आंदोलन केले जाईल.
आगामी आंदोलन केवळ शाळांशी संबंधित नसेल, तर दिलावर यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाईल. सीजेपीचे अभिजित दिपके यांनीही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होत असताना राजस्थान पोलीस शांतपणे पाहत होते. गोठ्यात शाळा सुरू असल्याबाबत त्यांना काहीच अडचण नाही. पण सीजेपी कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. ते नेमके कशाचे संरक्षण करत आहेत, असा सवाल दिपके यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.