

Tukaram Mundhe FDA appointment : राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग कधी नव्हे एवढे प्रकाशझोतात आले आहे. बनावट पनीर असो की हॉटेलमधील स्वच्छता... राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी विभागाकडून कठोर कारवाई केली जात आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे हे शक्य झाले आहे. सरकारही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पण मुंढे यांची या विभागात नियुक्ती कशी झाली, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी एका मुलाखतीत मुंढे यांच्या नियुक्तीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. अॅनालॉग पनीरवर बंदी आणता येत नसेल तर मेन्यू कार्डमध्ये नमूद करायला सांगा, अशी मागणी पाचपुतेंनी अधिवेशनात केली होती. त्यानुसार आदेश निघाला. पण त्यानंतर अनेक हॉटेलबाहेर आमच्याकडे अॅनालॉग पनीर नाही, असे फलक लावले. मेन्यू कार्डमध्ये बदल करण्याची गरजच पडली नाही. त्यानंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलो. यातून काही करून मार्ग काढा, असा आग्रह केल्याचे पाचपुते यांनी मुलाखतीत सांगितले.
१९ मेला काय घडलं?
मुख्यमंत्र्यांकडे आठ-दहा वेळा गेल्यानंतर त्यांनी तो मुद्दा समजून घेतला. यावर कारवाई कशी करता येईल,योग्य अधिकारी कोण असेल, यावर विचार केल्यानंतर त्यांनी तुकाराम मुंढे यांची निवड केल्याचे पाचपुते यांनी सांगितले. याबाबतचा १९ मे रोजी मुंबईत मंत्रालयात घडलेला किस्सा त्यांनी सांगितला.
पाचपुते यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी बाहेर आमदार समाधान आवताडे होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आतून निरोप आला, बाहेर बसलेल्या आमदारांना आत पाठवून द्या. मी आत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बोलत असतानाच तेवढ्यात तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यालयातून बाहेर गेले.
पुढून आमदार महेश शिंदे आले. यांनीही कलरबाबतचा एफडीएचा खूप चांगला प्रश्न मांडल्याचे मुख्यमंत्र्यांना मी सांगितले. आम्ही दरवाजातच उभे होतो. तेवढ्यात मुख्यमंत्री माझ्याकडे बघून (मुंढे यांच्याकडे बोटाने इशारा करत) म्हणाले, हा विभाग नीटच करतो. त्याच संध्याकाळी तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, असे पाचपुते यांनी सांगितले.
तुकाराम मुंढेंची नाराजी
एफडीएमध्ये नियुक्ती झाल्यानंतर मुंढे नाराज झाले होते, असेही पाचपुतेंनी मुलाखतीत सांगितले आहे. नियुक्तीनंतर मुंढे यांच्याशी मी फोनवर बोललो होतो. त्यांनी हे पद मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. हे पद दोन स्टेप डाऊन आहे, असे म्हटले होते. पण ही चांगली संधी असल्याचे मी म्हणालो होतो. त्यांनी आठ दिवस पदभार स्वीकारला नव्हता, असे पाचपुतेंनी सांगितले.
पदभार स्वीकारल्यानंतरही मी त्यांना फोन केला होता आणि भेटण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी थोडा वेळ द्या, आधी विभाग समजून घेतो, असे म्हटले आहे. त्यानंतर काही दिवसांनी आपण भेटायला गेल्यानंतर त्यांना विभागाचा व्याप लक्षात आला होता. मुंढे आता या पदाचा आणि कायद्याचा ताकदीने वापर करत आहेत, असे पाचपुते यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.