BJP, Congress Sarkarnama
देश

Rajya Sabha Election 2024 : काँग्रेसच्या हातून उत्तरेतील एकमेव राज्यही जाणार? क्रॉस वोटिंगमधून 'ऑपरेशन लोटस'च्या चर्चेनं खळबळ

BJP Operation Lotus News : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आठ ते नऊ आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याची जोरदार चर्चा आहे.

Rajanand More

Himachal Pradesh News : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2024) हिमाचल प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसच्या आठ ते नऊ आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. भाजपने यानिमित्ताने ऑपरेशन लोटस यशस्वी करत सत्ताधारी काँग्रेसला हादरा दिल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचं सरकारही कोसळेल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. 

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (CM Sukhvinder Singh Sukhu) आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह समर्थक या दोन गटांमध्ये नेहमीच राजकीय कुरघोडी सुरू असते. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे मानले जात आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्यात लढत होत आहे. महाजन हे वीरभद्र सिंह यांचे निकटवर्ती मानले जात होते. महाजन हे काँग्रेसमधूनच भाजपमध्ये (BJP) आले आहेत. त्यामुळे त्यांचे काँग्रेसच्या आमदारांशी आजही चांगले संबंध आहेत. त्यामुळे महाजन यांना आठ ते नऊ आमदारांनी मतदान केल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनीही सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही भाजपने काँग्रेसच्या आमदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात एकूण 68 आमदार असून 40 आमदार काँग्रेसकडे तर 25 आमदार भाजपकडे आहेत. दोन अपक्षांसह तीन आमदारांचे समर्थनही सुक्खू सरकारला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ सध्या 43 आहे. नऊ आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले असल्यास हा आकडा 34 वर पोहचतो. विजयासाठी प्रथम पसंतीच्या 35 मतांची गरज आहे. दोन्ही उमेदवारांना हा आकडा गाठला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील. यामध्येच भाजपला आशा आहे. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते महाजनांना दिल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

क्रॉस वोटिंग झालेली असल्यास काँग्रेस सरकारवर (Congress Government) नामुष्की ओढवू शकते. अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांचा पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणार असेल. त्याचप्रमाणे सरकारच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी 35 हा जादुई आकडा महत्वाचा आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT