Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News sarkarnama
देश

काँग्रेसला धक्का दिलेल्या सिब्बलांसह 41 जण बिनविरोध; महाराष्ट्रात राजकारण तापलं

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीमुळं महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असताना देशभरातील 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 18 उमेदवारांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसला धक्का दिलेल्या नेते कपिल सिब्बल हेही बिनविरोध राज्यसभेत जाणार आहेत. महाराष्ट्रात मात्र सहाव्या जागेवरून घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Rajya Sabha Election News)

देशभरातील विविध राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार होती. पण आता 41 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे केवळ 16 जागांवर निवडणूक होईल. त्यामध्ये सहा जागा एकट्या महाराष्ट्रातील आहेत. प्रामुख्याने सहाव्या जागेवरून महाविकास आघाडी व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. अपक्षांच्या भूमिकेवरच या लढतीचं भविष्य अवलंबून आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला आठ जागा

उत्तर प्रदेशात भाजपच्या आठ सदस्यांसह 11 जण बिनविरोध निवडून आले आहेत. डॉ. के. लक्ष्मण, मिथिलेश कुमार, बाबूराम निषाद, संगीता यादव, लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधा मोहन दास अग्रवाल, सुरेंद्र नागर व दर्शन सिंह हे भाजपचे सदस्य आहेत. तर कपिल सिब्बल आणि जयंत चौधरी हे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. सपाचे जावेद अलीही विजयी झाले आहेत.

छत्तीसगड काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी

काँग्रसचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. यात राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि रंजिता रंजन (Ranjeet Ranjan) यांचा समावेश आहे. भाजपकडे (BJP) पुरेसं संख्याबळ नसल्याने पक्षानं राज्यसभा उमेदवारच दिला नव्हता. त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला.

बिहारमधून पाच जण बिनविरोध

बिहारमधून पाच जण बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत. आरजेडीचे लालूप्रसाद यादवांची कन्या मिसा भारती आणि फैयाज अहमद हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे शंभूशरण पटेल आणि सतीशचंद्र दुबे तर संयुक्त जनता दलाचे (JDU) खिरू महातो विजयी झाले आहेत.

पंजाबमधून आपचे दोन तर मध्य प्रदेशात भाजपचे दोन उमेदवार

पंजाबमधून आपचे बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी यांची बिनविरोध निवड झाली आहे. मध्य प्रदेशातून भाजपच्या कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या विवेक तन्खा यांचीही मध्य प्रदेशातून बिनविरोध निवड झाली आहे. झारखंड राज्यातून झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी आणि भाजपचे आदित्य साहू हे बिनविरोध विजयी झाले आहेत. दोघेही पहिल्यांदाच राज्यसभेत दाखल होणार आहेत.

तमिळनाडूमधून सहाजण बिनविरोध

तमिळनाडूमधून द्रमुकचे के. एस. कल्याणसुंदरम, आर. गिरिराजन आणि केआरएन राजेश कुमार तर अण्णाद्रमुकचे के. सी. वी. शनमुगन आणि आर. धर्मर हे बिनविरोध विजयी झाले आहेत. द्रमुकच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. पी. चिदंबरम हे पुन्हा राज्यसभेत पोहचले आहेत. उत्तराखंडमधून भाजपच्या नेत्या डॉ. कल्पना सैनी या निवडून आल्या आहेत. तर आंध्र प्रदेशात वायएसआसीचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णैया आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT