BJP Ram Mandir Fund Allegation : राम मंदिर उभारणीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिलेल्या कथित 900 कोटी रुपयांच्या देणगीचा हिशेब अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, राम मंदिर निधीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल करत, इतिहासात महमूद गझनीनंतर जर देशाची सर्वाधिक लूट कोणी केली असेल, तर ती भाजपने केली आहे, असा खळबळजनक आरोप केला. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही अयोध्यातील राम मंदिरउभारणीच्या नावाखाली जनतेकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला होता, मात्र त्या निधीचा स्पष्ट हिशेब आजतागायत जनतेसमोर आलेला नाही.
राम मंदिर निधीच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर या वादाला आणखी धार मिळाली आहे. हरिप्रसाद यांनी, भाजप नेते नेहमी महमूद गझनीचे उदाहरण देतात. पण गझनीनंतर सर्वाधिक लूट जर कोणी केली असेल, तर ती भाजपनेच केली आहे, असा टोला लगावला.
मुकेश अंबानी यांनी दिलेल्या 900 कोटी रुपयांच्या देणगीचा हिशेब उपलब्ध नाही. आता पेजावर मठाच्या स्वामीजींनीही यावर प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची यावर काय भूमिका आहे? असा सवाल बी. के. हरिप्रसाद यांनी केला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्यावरही हरिप्रसाद यांनी पलटवार करत, जोशी हे केंद्रात मंत्री असून सर्व काही माहिती असल्याचा आव आणतात. एकेकाळी बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे हेच जोशी आज त्यांचाच गौरव करत आहेत. राम मंदिर ट्रस्ट हिशेब देण्यास तयार नाही. भाजपने प्रभू रामांचे नावही राजकारणासाठी वापरले असून त्यांच्या नावावरच लूट केली, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बिदडी टाउनशिप प्रकरणावर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांवरही हरिप्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री चर्चेसाठी विधिमंडळात येण्याचे आव्हान करत होते. रस्त्यावर बसून चर्चा होत नाही. आम्ही शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर बोलतो, असा टोला बी. के. हरिप्रसाद यांनी लगालवा.
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारच्या काळात दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनात 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देताना, त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नव्हता. मग आता शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्याचा दिखावा का केला जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे राम मंदिर निधी, भाजपची भूमिका आणि धार्मिक मुद्द्यांच्या राजकारणावर पुन्हा एकदा देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.