

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडवली आहे.
विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात मंदिरातील देणगी मोजणी केंद्रात कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोट्यवधी रुपयांची रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहा जण थेट देणगी मोजणीच्या कामाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले तेव्हा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी थेट गंभीर आरोप करत मोठा राजकीय स्फोट घडवला. त्यांनी दावा केला की, या कथित दान चोरी प्रकरणातील आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू हा श्रीराम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक आहे. इतकेच नाही तर आरोपी सुभाषचंद्र श्रीवास्तव हा रोख मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाल्यानंतर चंपत राय यांनी आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि आम आदमी पार्टीने या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, “भाजपचे ‘लंका पर्व’ आता अयोध्येतच सुरू झाले आहे. अखेर देणगीभक्तांचा मुखवटा उतरला असून प्रभू श्रीरामांच्या शक्तीने सत्य बाहेर आणले आहे. भाजपसाठी सुरू असलेला अमृतकाळ आता अंधःकालात बदलणार आहे.” त्यांच्या या विधानानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.
SIT तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी चोरी करण्यासाठी अत्यंत चलाख पद्धत वापरत होते. रोकड मोजणी सुरू करण्यापूर्वी एका कर्मचाऱ्याकडून CCTV कॅमेऱ्यावर कपडा टाकला जात असे किंवा कॅमेऱ्याचे दृश्य तात्पुरते ब्लॉक केले जात होते. त्यानंतर इतर कर्मचारी देणगी पेट्यांमधील नोटांचे बंडल कपड्यांमध्ये किंवा खिशात लपवत असत.
तपास यंत्रणेनुसार चोरी केलेली रोकड मंदिर परिसरातील शौचालयात आधीपासून तयार करून ठेवलेल्या गुप्त ठिकाणी लपवली जात होती. कामाचा दिवस संपल्यानंतर किंवा कोणालाही संशय येणार नाही याची खात्री झाल्यानंतर ही रक्कम बाहेर नेली जात असल्याचे उघड झाले आहे.
SIT ला मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये आरोपी मनीष यादव हा अनेक वेळा देणगी पेट्यांमधून पैसे काढताना स्पष्टपणे दिसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या वेळी कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळे चोरीचे प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू राहिल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला असून आरोपींपैकी काही जण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण अपहाराचे हे जाळे संगनमताने चालत असल्याचा संशय आता अधिक बळावला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या संपूर्ण प्रकरणात तब्बल 7 ते 7.5 कोटी रुपयांच्या देणगीचा अपहार झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून जवळपास 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
आता या अपहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का? मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एवढी मोठी त्रुटी कशी राहिली? आणि या प्रकरणाचे राजकीय पडसाद किती दूरपर्यंत जाणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.