Vinod Tawade-Ram Satpute-Sachin Kalyanshetti Sarkarnama
देश

Kerala Assembly Election : केरळमध्ये कमळ फुलविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील 87 नेत्यांवर; लुंगी नेसून नेते उतरले प्रचाराच्या आखाड्यात

Maharashtra BJP Leader Campaning in Kerala : केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील 87 नेत्यांना प्रचारात उतरवले असून देवेंद्र फडणवीसही सभांद्वारे आक्रमक मोहीम राबवत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 02 April : केरळ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण जोर लावला असून कोणत्याही परिस्थिती सत्ता काबीज करण्याचा चंग बांधला आहे. केरळ विधानसभेच्या विजयी मोहिमेसाठी महाराष्ट्रातील तब्बल 87 दिग्गज मराठी नेत्यांना पक्षाने प्रचाराच्या आखाड्यात उतरविले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही आज (ता. 02 एप्रिल) सभा होत आहेत. हे सर्व नेते केरळच्या पारंपारिक वेशात लुंगी आणि शर्ट घालून प्रचार करत आहेत. केरळच्या निवडणुकीत मराठा नेते भाजपची विजयी पताका फडकविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केरळ (Kerala) विधानसभेच्या 140 जागांसाठी येत्या नऊ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ही तब्बल 25 दिवसांनंतर म्हणजे 4 मे रोजी होणार आहे. केरळमध्ये आतापर्यंत डावे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आलटून पालटून आलेली आहेत. आतापर्यंत तिसऱ्या पक्षाला अजून एकदाही संधी मिळालेली नाही.

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे केरळचे प्रभारी आहेत. त्यांच्याकडेच प्रचार आणि निवडणुकीची मुख्य धुरा आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) 2016 च्या निवडणुकीत एक जागा जिंकली होती. मात्र, 2021 च्या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नाही. लोकसभा निवडणुकीत मात्र त्रिशुर लोकसभा मतदारसंघातून सुरेश गोपी हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. ते भाजपचे केरळमधील पहिले खासदार ठरले असून सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत, तर राष्ट्रीय सचिव खासदार विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली तिरुअनंतपूरमध्ये भाजपचा पहिला महापौर झाला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे.

राज्यातील ताकदवार 87 मराठी नेत्यांना केरळच्या मोहिमेवर पाठविण्यात आले आहे. ते सध्या 81मतदारसंघात भाजपचा प्रचार करत आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे कोट्टेरक्करा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे नेडूमंगाड मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी झटत आहेत. हे दोघे पंधरा दिवसांपासून केरळच्या प्रचारात आहेत.

तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील कझकूटम विधानसभा मतदारसंघात मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्याकडे ‘नेयाट्टीनकारा’, तर माजी आमदार गिरीश व्यास यांच्याकडे ‘नेमम’ मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

आमदार डॉ. परिणय फुके हे ‘पुनजर’ विधानसभा मतदासंघात प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि संघटन बांधणीवर भर देत आहेत. नागपूरसोबतच विदर्भातील आमदारही केरळमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. यामध्ये आर्वीचे आमदार सुमीत वानखेडे, गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, वरोराचे आमदार करण देवतळे, चिखलीच्या श्वेता महाले, अकोल्याचे रणजित पाटील आणि धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड हे विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचे डावपेच आखत आहेत.

देवेंद्र कोठे पुद्दुचेरीत

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे मात्र पुद्दुचेरीत जबाबरी देण्यात आलेली आहे. सध्या ते पुद्दुचेरीच्या प्रचारसभांत व्यस्त आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील कोठे यांच्यावर भाजपने ही विशेष जबाबदारी दिली आहे, हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT