Sachin Pilot in Punjab Sarkarnama
देश

Sachin Pilot news : सचिन पायलट यांनी सुरू केली तटबंदी; एका फोटोतून दिला दिल्लीला स्पष्ट संदेश

Punjab Congress factionalism, Charanjit Singh Channi, Raja Warring : पंजाब काँग्रेसमधील गटबाजी थोपवण्यासाठी सचिन पायलट यांची कसरत; चन्नी-वंडिंग यांना एकाच मंचावर आणत दिल्ली नेतृत्वाला एकजुटीचा संदेश.

Rajanand More

Congress Politics : कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणूक असली की काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचे अनेकदा पाहिले आहे. या अंतर्गत कलहामुळे काही राज्यांतून काँग्रेसच्या हातातोंडीशी आलेला सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला आहे. राजस्थान, हरियाणा अशी अनेक उदाहरणे देता येतील. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि आमदार सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. परिणामी पक्षाच्या हातून सत्ता गेली होती.

आता त्याच सचिन पायलट यांच्या खांद्यावर पंजाबमधील आगामी विधानसभेची धुरा देण्यात आली आहे. राज्यातील निवडणुकीसाठी त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबमधील पक्षाच्या नेत्यांमध्येही मोठा कलह उघडपणे समोर येताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष राजा अमरिंदर सिंग वंडिंग असे दोन गट पक्षात पडले आहेत.

दोन्ही गटांतील वादाचे पडसाद अनेक पक्षाच्या कार्यक्रमातही पडले आहेत. पण पायलट यांनी पहिल्यांदाच दोघांनाही एका आंदोलनात एकत्र आणत सूचक संदेश दिला आहे. काँग्रेस नेते गुलजार सिंह यांच्या मृत्यूनंतर मंत्री हरपाल सिंह चीमा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आंदोलन केले. याच आंदोलनातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये सचिन पायलट यांच्यासोबत एका बाजूला चन्नी आणि दुसऱ्या बाजूला वंडिग दिसत आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही गटातील नेतेही आहेत. त्यामध्ये विजय इंदर सिंगला, प्रताप सिंह बाजवा, सुखजिंदर सिंह रंधावा, गुरजीत सिंह औजिला या नेत्यांचा समावेश आहे. हा फोटो पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा मानला जात आहे. तसेच पायलट यांनी सर्व नेत्यांना एका सार्वजनिक मंचावर आणत पक्षनेृत्वापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस नेते एकजुट झाल्यास निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदाच होणार आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजपचेही टेन्शन वाढू शकते. खरंतर पायलट यांची ही अग्निपरीक्षा असणार आहे. मागील निवडणुकीत चन्नी विरूध्द नवज्योत सिग सिध्दू असे दोन गट पडले होते. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडला होता.

आताही नेत्यांमधील मतभेद डोकेदुखी ठरत आहे. पायलट यांना हे मतभेद दूर करून नेत्यांना एकसंध ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी तटबंदी सुरू केल्याचे दिसू लागले आहे. मात्र, ही तटबंदी किती मजबूत असेल, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT