

BJP MP divorce case : वेगवेगळ्या पक्षांतील राजकीय घराण्यांमध्ये नातेसंबंधांचे अनेकदा पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील शहडोल लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार हिमाद्री सिंह यांच्याबाबतीतही असेच घडले होते. पण आता त्यांचे पती नरेंद्र सिंह मरावी यांच्यासोबतचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे.
हिमाद्री सिंह या राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले दलवीर सिंह आणि माजी खासदार राजेश नंदिनी सिंह यांच्या कन्या आहेत. हे कुटुंब पूर्वी काँग्रेसमध्ये होते. दलवीस सिंह हे त्यावेळी आदिवासी भागातील मोठे नेते मानले जात होते. राजेश नंदिनी सिंह यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात नरेंद्र सिंह मरावी हे भाजपच्या तिकीटावर उभे होते. मात्र, मरावी यांचा पराभव झाला होता.
पुढे सिंह आणि मरावी कुटुंबाची जवळीक वाढली आणि त्याचे रुपांतर नातेसंबंधात झाले. हिमाद्री सिंह आणि नरेंद्र मरावी यांचा २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्याच्या काही महिने आधी हिमाद्री यांनी काँग्रेसच्या तिकीटावर २०१६ मध्ये निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हिमाद्री यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये शहडोल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग दोनदा विजय मिळविला आहे. या भागात युवा आदिवासी नेत्या म्हणून त्या परिचित आहेत. दरम्यानच्या काळात मरावी यांनी २०१८ मध्ये पुष्पराजगढ विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. हा मतदारसंघ हिमाद्री यांच्या मतदारसंघातीलच आहे.
एकीकडे हिमाद्री यांचे राजकीय वजन वाढत असताना मरावी यांच्या पदरी मात्र अपयश पडत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिथेही त्यांना यश मिळाले नव्हते. त्यातच मागील काही वर्षांपासून दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. यामागे राजकीय मतभेदाचे कारण असल्याची जोरदार चर्चा होती.
काही वर्षांपासून हे दाम्पत्य वेगळे राहत होते. दोघांच्या घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू होता. अखेर त्यावर कोर्टाने नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. नऊ वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.