Delhi Assembly Election 2025 Sarkarnama
देश

Delhi Assembly Election : केजरीवाल यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा रिंगणात ; आईच्या पराभवाचा वचपा काढणार ?

Congress Candidate For assembly Election : काँग्रेसनं 'आप'वर कुरघोडी करत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपली 21 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. या यादीमध्ये काँग्रेसने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासमोर तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.

Rashmi Mane

Delhi News: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाहीये तरीही आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच आता काँग्रेसनं 'आप'वर कुरघोडी करत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यासमोर तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.

नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांच्या विरोधात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप दीक्षित यांना नवी दिल्लीतील सर्वात हायप्रोफाईल मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. अरविंद केजरीवाल यांची ही जागा आहे. मात्र, 'आप'ने अद्याप येथील उमेदवार जाहीर केलेला नाही.

केजरीवाल यांचे कट्टर विरोधक

काँग्रेस नेते संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कट्टर विरोधक आहेत. जेव्हा-जेव्हा काँग्रेसने 'आप'सोबत युती केली, तेव्हा संदीप दीक्षित यांनी त्याला विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत केलेल्या युतीबाबत संदीप म्हणाले होते - स्वाभिमानापेक्षा मोठे काहीही नाही. आमचा सन्मान बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या (केजरीवाल) पाठीशी उभे आहोत.

आईचा पराभव

संदीप दीक्षित यांची केजरीवाल यांच्यावरची चिडचिड होण्याचे कारण म्हणजे 2013 च्या विधानसभा निवडणुका. खरे तर पहिल्यांदा नवी दिल्लीची जागा 2008 मध्ये निर्माण झाली याआधी ते गोल मार्केट सीट असायचे. शीला दीक्षित यांनी 1998 आणि 2003 मध्ये येथून निवडणूक जिंकली होती. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघाचा विस्तारानंतर त्यांनी नवी दिल्लीत निवडणूक जिंकली. पण 2013 च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा येथून पराभव केला. केजरीवाल यांना 44,269 मते मिळाली. शीला दीक्षित यांना 18,405 मते मिळाली होती. केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25864 अशा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.

पक्षाचा पराभव

2013 च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या हातून काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. पराभव असा झाला की, गेल्या दोन निवडणुकीत पक्षाला येथे खातेही उघडता आले नाही. 2013 मध्ये शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला केवळ 8 जागा जिंकता आल्या होत्या. केजरीवाल यांनी काँग्रेस मतदारांना स्वत:कडे आकर्षित केले, त्यामुळे दिल्लीत पक्षाचा जनाधार कमी होत गेला. 2013 मध्ये काँग्रेसला 24% मते मिळाली होती. 2015 च्या निवडणुकीत ते 9 टक्क्यांवर आले. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 4% मते मिळाली होती.

केजरीवाल कोठून निवडणूक लढवणार?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची जागा बदलण्यात आली आहे. ते पटपडगंज सोडले असून जंगपुरा येथून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय बहुतांश विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. अशा स्थितीत केजरीवालही आपली जागा बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी नवी दिल्लीतूनच निवडणूक लढवली तर त्यांना संदीप दीक्षित विरूद्ध अरविंद केजरीवाल अशी थेट लढत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT