Mumbai News, 13 Aug : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदेचे कामकाज, भाजपमधील अंतर्गत राजकारण तसेच शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर त्यांनी भाष्य केलं.
तर यावेळी राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचं आहे. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. ते म्हणाले, “अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात मोदी-शहांमध्ये मतभेद असून शहांनी मागणी केली आहे की, "मला तुमचे वारसदार म्हणून, देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा आणि मोदींनी त्याला नकार दिला दिला आहे."
तर संसदेच्या कामकाजावरूनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असे सांगत भाजप स्वतःला शिस्त आणि नीतीमत्तेचा पक्ष म्हणवून घेत असल्याने त्यांनीही नियमांचे पालन करावे, चर्चेपासून विरोधक पळत नसून अमित शाह यांचीच पळापळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची घटनापीठासमोर सुनावणी होत असून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
“उद्या कोणीही येऊन विधिमंडळ पक्षातील गट विकत घेऊ शकतो. असे झाले तर संविधान धोक्यात येईल. कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद ऐकून न्यायालयालाही या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करावा लागत आहे,” असे राऊत म्हणाले. शिवसेनेच्या स्थापनेचा आणि पक्ष नेतृत्वाचा इतिहास सांगताना राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्याचा दावा केला.
त्यानुसार पक्षाच्या घटनेत बदल करून त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. असे असतानाही निवडणूक आयोगाने या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचा आरोप त्यांनी केला. “निवडणूक आयोग अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत आहे. आधी उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवार आणि इतर राजकीय पक्षांबाबतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या,” असा आरोपही राऊतांनी केला.
राजकीय पक्षांच्या फुटीमागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात अखेर संविधानाचा विजय होईल आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.