Sanjay Raut | Manoj Jarange | Eknath Shah Sarkarnama
देश

Manoj Jarange Patil : 500 कोटींचे प्रकरण ईडीकडे सोपवा, खासदाराचे थेट अमित शहांंना पत्र, भाजप नेत्यांसह शिंदे पिता-पुत्राच्या अडचणी वाढणार?

Sanjay Raut's Letter to Amit Shah : "महाराष्ट्रातील 500 कोटी रुपयांचे प्रकरण आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले असेल. आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या. आता आंदोलनंही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. जरांगेंना 500 कोटी रुपये देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे सुपूर्द केले."

Jagdish Patil

Maharashtra 500 crore controversy : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपाची मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) चौकशी करावी आणि या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) सोपवावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात राऊत यांनी शाह यांना पत्र लिहिले आहे.

या पत्राची प्रत खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राऊत यांनी लिहिले की, "महाराष्ट्रातील ५०० कोटी रुपयांचे प्रकरण आतापर्यंत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले असेल. आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या. आता आंदोलनंही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे सुपूर्द केले.

हा पैसा नेमका कुठून आला आणि तो प्रत्यक्षात जरांगे यांच्यापर्यंत पोहोचला का?" असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) येत असल्याने त्याचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) सोपवावा, अशी विनंती राऊत यांनी शाह यांना केली आहे. राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी केलेले धक्कादायक आरोप आणि खुलासे आपल्याला निश्चितच माहीत असतील.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील कोअर टीममधील वरिष्ठ नेत्यांकडून ५०० कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना दिली जाणार होती, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र, ही रक्कम प्रत्यक्षात जरांगे यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही.

जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलेले हे खुलासे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. यातील सर्वाधिक धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे ५०० कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या रकमेचा सहभाग. ५०० कोटी रुपये नेमके कोणी कोणाला दिले आणि ही रक्कम जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसेल, तर ती कुठे गायब झाली, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. एवढी मोठी रक्कम कुठून आली आणि ती नेमकी कुठे गेली? हा संपूर्ण प्रकार मनी लॉन्ड्रिंगचा ठळक प्रकार असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणाचा त्याच दृष्टिकोनातून तपास होणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सक्तवसुली संचालनालयाला (ED) लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही राऊत यांनी अमित शाह यांना केली आहे. याशिवाय, या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आणून घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना अटक करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, राऊत यांनी यावेळी मार्च २०२१ मधील एका प्रकरणाची आठवण करून दिली आहे. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून त्यांच्याकडे देण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता. परमबीर सिंह यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ आरोप केले होते. तरीही ED ने अत्यंत तत्परतेने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक केली.

त्या प्रकरणाच्या तुलनेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेले खुलासे अधिक गंभीर आहेत. कारण, त्यांनी नाकारता न येण्याजोगा पुरावा दिला असून या प्रकरणातील रक्कमही खूप मोठी आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, भाजपमधील कोणत्या नेत्याने एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये दिले आणि ही रक्कम मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यास ती नेमकी कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि ED ला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) लागू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

या ऑडिओ क्लिपवरून भाजपचे वरिष्ठ नेते आणि कोअर टीम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे या मोठ्या घोटाळ्यात सहभागी असल्याचे स्पष्ट होते, असेही राऊत यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे ED मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता यावर केंद्रीय गृहमंत्री नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT