Chirag Paswan, Supreme Court Sarkarnama
देश

Chirag Paswan : दलित मंदिरात गेले तर गंगाजलाने..! केंद्रीय मंत्र्यांनीच दाखवला आरसा

Rajanand More

New Delhi : अनुसूचित जाती व जमाती आरक्षणावरून देशभरातील वातावरण तापू लागले आहे. सुप्रीम कोर्टाने या आरक्षणांतर्गत उपवर्गीकरणास मान्यता देत क्रिमिलेअरबाबतही मोठे विधान केले आहे. या निकालाला अनेकांनी विरोध केला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही पुढे सरसावले आहेत.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या निकालाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आजही दलित मंदिरात गेल्यानंतर ते मंदिर गंगाजलाने धुतले जाते. आजही देशात जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे सांगत त्यांनी देशातील जातीयवादावर मोठे भाष्य केले आहे.

क्रिमिलेअरबाबत सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर बोलताना पासवान म्हणाले, या निरीक्षणाशी आम्ही असहमत असून त्याबाबत ठोस भूमिकाही मांडली आहे. एससीतील आरक्षणाचा पाया हा अस्पृश्यता असून शैक्षणिक किंवा आर्थिक नाही. अशा स्थितीत त्यामध्ये क्रिमिलेअरची तरतूद असू शकत नाही.

आरक्षणांतर्गत आरक्षण योग्य नाही. आजही दलित तरुणांना घोडेस्वारी करण्यापासून रोखल्याची उदाहरणे आहेत. मोठ्या पोस्टवर असलेली अनेक मोठी नावे आहेत. पण ते मंदिरात गेल्यानंतर मंदिर गंगाजलाने धुतले जाते. आजही अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयवाद अस्तित्वात आहे. त्यामुळे कोर्टात आम्ही निकालावरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशा आंबडेकर यांनी उपवर्गीकरण तसेच क्रिमिलेअरला विरोध केला आहे. त्यांनी न्यायव्यवस्थेतील एससी, एसटी न्यायाधीशांची टक्केवारी सांगताना आजही दलितांना उच्च पदांवर स्थान मिळत नसल्याचे म्हटले आहे.

आंबेडकर यांच्याप्रमाणेच देशातील अनेक नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना निकालाला विरोध केला आहे. त्यांनी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय खरी स्थिती समोर येणार नाही, असे म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT