Maharashtra Political News : बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. पवार हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवारांनी केला होता. हाच मुद्दा धरून शरद पवारांचे वकील देवदत्त कामतांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले. शरद पवार गटाच्या सुनावणीचा आजचा दिवस शेवटचा होता. दरम्यान, अजित पवार गटाची गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे नाव आणि चिन्ह घड्याळ यावर अजित पवार गटाने दावा ठोकत निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानुसार आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाने आपला युक्तिवाद केला असून, आता अजित पवार गट युक्तिवाद करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शेवटच्या दिवशी बुधवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटाचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न केला आहे. आता अजित पवार गटाची सुनावणी सोमवारी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
बंडानंतर अजित पवार (Ajit pawar) गटाने निवडणूक आयोगात जात शरद पवारांवर हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवण्याचा आरोप केला होता. यावर युक्तिवाद करताना कामतांनी, 'हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला जात होता, तर त्याचवेळी पक्षांतर्गत निवडणूक का घेतली नाही. उलट अध्यक्ष म्हणून पवारांच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांचीच सही आहे. तसेच पवारांच्या अध्यक्ष म्हणून निवडीवर गाव, तालुका अशा कुठल्याही स्तरावरून आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा त्यांची निवड चुकीची आहे, असेही म्हटलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाने उपस्थित केलेला दावाच मुळात चुकीचा आहे,' असेही कामत यांनी म्हटले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार गटावर खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सहभागी सदस्यांची दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा केला आहे. परिणामी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे अजित पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आता राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यासाठी अजित पवार गटाची गुरुवारी होणारी सुनावणी सोमवारी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. या वेळी अजित पवार गट स्वतःचा बचाव कसे करणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.